बैलांना निर्दयपणे वागवून घाटात पळवले; बंदी असतानाही शर्यतीचे आयोजन करणाऱ्या २१ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 11:32 AM2021-07-12T11:32:24+5:302021-07-12T11:33:40+5:30
वडगाव मावळ येथे बंदी असूनही बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते
वडगाव मावळ: महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीवर बंदी असताना शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी मावळमधील २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मावळमधील शिवणे येथे बैलगाडा शर्यतीच आयोजन करण्यात आले होते. या घटनेप्रकरणी पोलीस कर्मचारी आशिष अर्जुन काळे यांनी फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांत गाडा मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश दत्तात्रय म्हस्के, हनुमंत शिवाजी म्हस्के, विक्रम बाळासाहेब केडे, आदिनाथ बाळू गराडे, आदिनाथ बाळू म्हस्के, मनोज अंकुश ढोरे यांच्यासह २१ जणांवर गुन्ह दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळमधील शिवणे येथे बैलगाडा घाटात आज सकाळी दहाच्या सुमारास बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आले होते. कोव्हीड नियमांचं उल्लंघन करत शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. बैलांना यातना होईल, अशा प्रकारे क्रूरतेनं व निर्दयपणे वागवून बैलगाडा चढणीच्या रस्त्याने घाटात पळवण्यात आला. क्षमतेपेक्षा आणि ताकदीपेक्षा बैलांचा छळ केला आहे असं फिर्यादीत म्हटलं आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.