राज्यात ५३ आयसोलेशन कोचमध्ये ९६ रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:10 AM2021-05-06T04:10:34+5:302021-05-06T04:10:34+5:30
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदाच राज्यांत कोरोना रुग्णांसाठी आयसोलेशन कोचचा वापर झाला. स्थानिक प्रशासनाने मागणी करताच रेल्वेने तीन ...
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदाच राज्यांत कोरोना रुग्णांसाठी आयसोलेशन कोचचा वापर झाला. स्थानिक प्रशासनाने मागणी करताच रेल्वेने तीन शहरांत रेल्वे डब्यांची व्यवस्था केली. यात नंदुरबार, अजनी व पालघरचा समावेश आहे. जवळपास ५३ कोचचे आयसोलेशन कोचमध्ये रुपांतर करून ९६ रुग्णांवर उपचार करण्यात आले. पैकी ७० रुग्ण आता घरी सुध्दा परतले. यात नंदुरबार येथील रुग्णांची संख्या अधिक आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यासह देशाची परिस्थिती गंभीर झाली. आजही रुग्णांना बेड, ऑक्सिजन मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. राज्यात सर्वात आधी नंदुरबार प्रशासनाने पश्चिम रेल्वे कडे आयसोलेशन कोचची मागणी केली. त्यानुसार पश्चिम रेल्वेने २१ आयसोलेशन कोच नंदुरबार साठी उपलब्ध करून दिले. त्याठिकाणी आतापर्यंत ९० रुग्णांवर उपचार झाले. पैकी ७० रुग्ण घरी परतले तर सद्य:स्थित २० रुग्णांवर उपचार सुरू आहे. यानंतर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागकडे आयसोलेशन कोचची मागणी झाली. त्यानुसार ११ कोच तयार केले. येथे ६ रुग्णांवर उपचार झाले. तर पालघर प्रशासनाने सुद्धा रेल्वेकडे कोचची मागणी केली. त्यानुसार पश्चिम रेल्वेने दोन दिवसांपूर्वी पालघर प्रशासनाच्या ताब्यात २१ कोच दिले आहे. येत्या १ ते २ दिवसांत येते रुग्णांना दाखल केले जाईल, असे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले.
चौकट
रेल्वेने तयार केले ९३२ बेड
नंदुरबार (२१), पालघर (२१) व अजनी (११) असे मिळून रेल्वेने ५३ कोचचा वापर केला. प्रत्येक डब्यांत १८ बेडची व्यवस्था केली. असे मिळून ९३२ बेडची व्यवस्था करण्यात आली.
चौकट
डबे तापू नये म्हणून
सध्या उन्हाळा सुरू असल्याने डबे चांगलेच तापातात. त्यामुळे आत उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागले असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने डब्यांतील तापमान कमी करण्याकरिता शक्कल लढवली. डब्यांच्या वरच्या बाजूस पोते अंथरून त्यांवर पाण्याची धार सोडली. डब्यांच्या खिडकी समोर कुलर सुरू केले. तसेच ज्या ठिकाणी डबे ठेवण्यात आले त्या ठिकाणी मंडप मारला. परिणामी डब्यांतील तापमान कमी झाले.
कोट
नंदुरबार व पालघर येथे प्रत्येकी २१ आयसोलेशन कोच तयार केले. नंदुरबार मध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहे. पालघर मध्ये देखील स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार रुग्णांना दाखल केले जाईल. ज्या ज्या ठिकाणी कोच संदर्भात मागणी येईल त्या ठिकाणी आम्ही कोच उपलब्ध करून देऊ.
- सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे, मुंबई