प्राण्यांच्या हर्निया आजारावरही उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 02:23 AM2019-01-09T02:23:56+5:302019-01-09T02:24:16+5:30
पशुवैद्यकीय महाविद्यालयात होते शस्त्रक्रिया : लॅप्रोस्कोपीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान
सागर नेवरेकर
मुंबई : परळच्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये लॅप्रोस्कोपी (दुर्बीण) पद्धतीने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून प्राण्यांची शस्त्रक्रिया केली जाते. लॅप्रोस्कोपी ही एक कमी इजा देणाऱ्या शस्त्रक्रियेचा प्रकार आहे, जी मानवी शस्त्रक्रियेमध्ये सामान्यपणे वापरली जाते. पशु शल्यचिकित्सा शास्त्रामध्ये लॅप्रोस्कोपीचा वापर वाढत आहे. तसेच महाविद्यालयामध्ये हर्निया आजारावर अद्ययावत यंत्रणा भविष्यकाळात बसविल्या जाणार आहेत.
लॅप्रोस्कोपी तंत्रज्ञानाचा उपयोग प्राण्यांवर करून प्राण्यांना कमी वेदना देणारी उपचारपद्धती आता मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘लॅप्रोस्कोपी शल्यचिकित्सा व प्रशिक्षण केंद्रा’त केली जाते. लॅप्रोस्कोपी शल्यचिकित्साद्वारे आतापर्यंत हजाराहून अधिक प्राण्यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. कुत्रा, मांजर, डुक्कर, ससे, गाई-म्हशी या प्राण्यांवर सर्वाधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. लॅप्रोस्कोपीमध्ये सामान्य शस्त्रक्रियेपेक्षा फारच कमी वेळ बरे होण्यासाठी लागतात. हर्निया आजारावर अद्ययावत तंत्रज्ञान असलेली सामग्री आणि उपकरणे भविष्यकाळात महाविद्यालयात दाखल होणार आहे. केंद्र यशस्वीपणे सुरू ठेवण्यासाठी पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे तत्कालीन संशोधन संचालक डॉ. ए. बी. सरकटे, महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. ए. एम. पातुरकर आणि मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पी.एल. धांडे यांची मोलाची साथ लाभली आहे.
श्वान आणि मांजरातील मूत्राशय व मूत्राशय पिशवीतील खडे निदान करून काढणे, पोटविकारावरील निदान व पोटातील अविद्राव्य घटक जसे की बेल्ट, नाणे, लोखंडी पिन, तार, लॅप्रोस्कोपीद्वारे काढणे, छाती विकाराचे निदान व शस्त्रक्रियाद्वारे छातीचा आतील फाटलेला पडदा शिवणे. तसेच कान, नाक, घसा यातील रोग निदान व रोग निवारण करणे, मादी कुत्री व मांजरातील गर्भाशय पिशवी आणि नरातील निर्बीजीकरण करणे, पोट विकार व छाती विकार निदान करण्यासाठी सूक्ष्म प्रमाणात अवयवाचा तुकडा परीक्षणासाठी काढणे अशा अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया नियमितपणे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या लॅप्रोस्कोपी कक्ष व प्रशिक्षण केंद्र येथे केल्या जातात, अशी माहिती मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय शल्यचिकित्सा विभागाचे प्राध्यापक डॉ. गजेंद्र खांडेकर यांनी दिली.
१५ तंत्रज्ञानाच्या शिफारशी
पशुवैद्यकीय क्षेत्रात लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया तंत्रज्ञानामध्ये विद्यापीठ स्तरावरील जॉइंट रिसर्च काउन्सिलवर १५ तंत्रज्ञानाच्या शिफारशींना मान्यता मिळाली आहे. या तंत्रज्ञानाचा फिल्डवर उपयोग करण्यासाठीही शिफारस करण्यात आली़
प्रशिक्षण वर्ग : यापूर्वी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेची कला आत्मसात करण्याकरिता पशुवैद्यकांना परदेशात जावे लागत होते. पण ‘कायम शिक्षण सुरू ठेवा’ या अभियानांतर्गत मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यातील कार्यक्रमाद्वारे प्रशिक्षणातून अनेक पशुवैद्यकांना व महाराष्ट्र शासनातील पशुधन विकास अधिकारी वर्ग यांना लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण दिले जाते.
महाविद्यालयाला तीन कोटींचा निधी
‘लॅप्रोस्कोपी’द्वारे (दुर्बिणीद्वारे) पशुवैद्यकाचे रोग निदान आणि उपचार करण्याच्या कौशल्याची सुधारणा करून पशू उत्पादन व पशू आरोग्य राखणे या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाकडून ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता.