वृक्षगणनेत एका झाडाला २२ रुपये ७० पैसे..!
By Admin | Published: February 28, 2016 03:49 AM2016-02-28T03:49:54+5:302016-02-28T03:49:54+5:30
शहराच्या कोणत्याही कोपऱ्यातील एखादे झाड, ते किती वर्षाचे आहे, रोज किती कार्बन शोषून ते पर्यावरणाला मदत करते, त्याचे आयुष्य किती, सध्याची अवस्था काय आहे, या
पुणे : शहराच्या कोणत्याही कोपऱ्यातील एखादे झाड, ते किती वर्षाचे आहे, रोज किती कार्बन शोषून ते पर्यावरणाला मदत करते, त्याचे आयुष्य किती, सध्याची अवस्था काय आहे, या महत्त्वाच्या माहितीबरोबरच ते कुठे आहे, त्याचे शास्त्रीय, प्रचारातील नाव, अशी साधी माहितीही आता केवळ एका क्लिकसरशी मिळणार आहे. शहरातील सर्व वृक्षांच्या अशा अत्याधुनिक गणनेसाठी पालिकेच्या स्थायी समितीने तब्बल ९ कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली आहे. पडलेल्या, पाडलेल्या, तसेच नव्याने लावलेल्या वृक्षांची माहितीही यात अपडेट होत राहणार आहे.
स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांनी ही माहिती दिली. शहरातील वृक्षांची दर ५ वर्षांनी गणना करणे पालिकेवर बंधनकारक आहे. यापूर्वी सन २०१३ मध्ये अशी गणना झाली होती. मात्र, ती साधी होती. नव्या अत्याधुनिक पद्धतीने गणना व्हावी, यासाठी पालिकेने निविदा जाहीर केली होती. तीन कंपन्यांनी निविदा दाखल कल्या. त्यातील सार आयटी या कंपनीची निविदा सर्वांत कमी म्हणजे एका वृक्षासाठी २२ रुपये ७० पैसे या दराची होती. या निविदेला मंजुरी दिली असल्याचे कदम यांनी सांगितले. त्यांच्या गणनेनंतर शहरातील कोणत्याही वृक्षासंबधी एकूण २० ते २२ प्रकारची माहिती पालिकेकडे जमा होणार आहे. २ वर्षांत त्यांचे काम पूर्ण होणार असले, तरी करार पुढची जनगणना होईपर्यंत, असा केला जाणार आहे.
पालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, की एका वृक्षासाठी ही रक्कम जास्त वाटत असली, तरीही त्यांच्याकडून जमा करण्यात येणारी माहिती पाहता ती कमीच आहे. या नव्या वृक्षगणनेत प्रत्येक वृक्षाचे त्या परिसराच्या नकाशावर अक्षांश-रेखाशांसह स्थान दिसेल, पर्यावरणसंरक्षणात त्याची उपयुक्तता किती टक्के, तो फुलतो कधी, त्याला फळे केधी येतात, तेही सांगता येईल. साधारण १० सेंटीमीटर व्यासाचे खोड असलेले, ३ मीटर उंची असलेले, पालिका हद्दीतील सरकारी, खासगी, सार्वजनिक अशा कोणत्याही जागेवरील प्रत्येक झाडाची यात नोंद होणार आहे. येत्या महिनाभरात सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन कंपनीचे काम सुरू होईल, असे घोरपडे यांनी सांगितले आहे.
अशा प्रकारची अत्याधुनिक वृक्षगणना करणारी पुणे महापालिका ही पहिलीच महापालिका आहे, अशी माहिती घोरपडे यांनी दिली. पुण्यातील प्रत्येक वृक्षाची सर्व प्रकारची माहिती यामुळे पालिकेकडे जमा होणार असून, त्यातून कोणत्या प्रभागात झाडे लावण्याची गरज आहे, कोणती झाडे लावण्याची गरज आहे, ते समजणार आहे.