जगण्यासाठी झुंज दिलेल्या ‘तिच्या’साठी वृक्षलागवड
By admin | Published: June 10, 2017 01:48 AM2017-06-10T01:48:06+5:302017-06-10T01:48:06+5:30
त्या निराधार महिलेची जगण्याची २१ दिवसांची झुंज अखेर संपली. मात्र, भविष्यकाळात अशा प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : त्या निराधार महिलेची जगण्याची २१ दिवसांची झुंज अखेर संपली. मात्र, भविष्यकाळात अशा प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी बळ मिळावे, याकरिता त्या महिलेच्या जगण्यासाठी जिवाचा आटापिटा करणाऱ्या इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, पारिचारिका व सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते स्वयंसेवी संस्थांच्या वतीने बुधवारी (दि. ७) त्या महिलेच्या नावाने उपजिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
सविस्तर हकीकत अशी : दि. १३ मेच्या रात्री इंदापूर एसटी बस स्थानकाच्या आवारात अत्यंत हलाखीच्या अवस्थेत ५० ते ५५ वर्षे वयाची एक महिला पडलेली होती. मुंबईच्या एका जागृत महिला प्रवाशाने ‘स्माईल प्लस सोशल फाऊंडेशन’ या निराधारांसाठी कार्य करणाऱ्या समाजसेवी संस्थेच्या ग्रुपवर सदर महिलेची छायाचित्रे टाकली.
ती छायाचित्रे पाहून रात्री ११च्या ‘स्माईल प्लस सोशल फाउंडेशन’चे प्रमुख योगेश मालखरे यांनी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सिताप यांना मोबाईलवरून ही माहिती दिली. सिताप यांनी आपले सहकारी रोहित काळे, गजाभाऊ पवार, अमोल माने यांच्या मदतीने त्याच रात्री तिला उपचारांसाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर गेले २१ दिवस महिलेवर उपचार करीत होते. मात्र, पायाच्या हाडाला झालेली दुखापत व दुर्धर आजार यांमुळे ती जगू शकली नाही.