वृक्ष तोड-लागवडीचे होणार आॅडीट - रामदास कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 03:56 AM2017-11-30T03:56:40+5:302017-11-30T04:05:12+5:30
बांधकाम व्यावसायिक, खासगी कंपन्या आदींना त्यांच्या आराखड्यानुसार (प्लॅन) झाडे तोडण्याची परवानगी देताना मान्य केल्याप्रमाणे किती झाडांची लागवड केली याचे मागील पाच वर्षांचे आॅडीट केले जाणार आहे.
पुणे : बांधकाम व्यावसायिक, खासगी कंपन्या आदींना त्यांच्या आराखड्यानुसार (प्लॅन) झाडे तोडण्याची परवानगी देताना मान्य केल्याप्रमाणे किती झाडांची लागवड केली याचे मागील पाच वर्षांचे आॅडीट केले जाणार आहे. आॅडीटमध्ये दोषी आढळलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बुधवारी दिली.
मुंबईसह पुणे आणि मोठ्या शहरांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरु आहेत. तसेच विविध कंपन्या, खासगी कार्यालये यांना बांधकामाचे प्लॅन मंजूर करताना येथील जागेतील झाडे तोडण्याची परवानगी दिली जाते. ही परवानगी देताना एका झाडामागे तीन झाडांची अन्यत्र मोकळ्या जागेत लागवड करण्याची अट घातली जाते. मात्र, अनेकदा अट मंजूर करुन घेतली जाते, परंतु झाडेच लावली जात नाहीत. त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते आहे. बांधकाम व्यावसायिक, कंपन्या, उद्योजक यांच्याकडून झालेल्या वृक्ष लागवडीचे मागील पाच वर्षांचे आॅडीट करुन त्याचा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. दोषींवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.
मुठा नदीची पाहणी करून अहवाल द्या
पुण्यातील मुठा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडण्यात येत असून नदी पात्रात अतिक्रमणे वाढली आहेत. डीपी रस्त्यावर मंगल कार्यालये, लॉन्स आणि हॉटेल्स वाढली आहेत. नदीमधील पाणी प्रचंड प्रदुषित झाले आहे. या सर्व स्थितीचा आढावा घेऊन दोषींवर कारवाई करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश कदम यांनी दिले आहेत.
संजय राऊत यांच्या टीकेनंतरही आपली भूमिका ठाम
‘आपल्याला भाजपा, शरद पवार, नारायण राणे यांच्याबद्दल न बोलण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून त्यामुळे घशाला त्रास होतो’ असा उपरोधिक टोला राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सध्याच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय पक्षांना लगावला. गुढी पाडव्याला प्लॅस्टीक बंदी करण्यावर माझा भर आहे. त्यामुळे राजकारणावर भाष्य टाळत असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्यावतीने विधानभवन येथे महसुली विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबालगन यांच्यासह पाच जिल्ह्णातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांची बैठक पार पडली. बैठकीदरम्यान त्यांनी फटाके बंदीचा निर्णय योग्य होता आणि त्यामुळे मुंबईत यंदा 70 टक्के कमी फटाके वाजल्याचे स्पष्ट केले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या ताब्यातील नांदेड महापालिकेने शहरात दहा पक्के नाले बांधून सगळे सांडपाणी गोदावरी नदीमध्ये सोडले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांसह अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच अशोक चव्हाण यांनी आपली भेट घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला मात्र आपण त्यांना कायदा म्हणजे कायदा असे सांगितल्याचेही कदम यांनी अधिका-यांना सांगितले.
पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना राजकीय प्रश्न विचारण्यात आले. मात्र, त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणे टाळत प्लॅस्टीक बंदी आणि थर्मोकोल बंदी हीच आपल्यापुढील महत्वाची कामे असून कायदा बनविण्यात व्यस्त असल्याचे सांगितले. त्यामुळे आपण शरद पवार, नारायण राणे, भाजप आणि विधान परिषद निवडणुकीबद्दल बोलणार नसल्याचे सांगितले.
दिवाळीपुर्वी फटाके वाजविण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर हिंदुविरोधी निर्णय असल्याची टीका झाली होती. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही त्याला विरोध करीत माझ्यावर टीका केली होती. मात्र, माझी भुमिका योग्य असल्याने आम्ही हा निर्णय लावून धरला. त्याचा परिणाम चांगला
झाल्याचे पहायला मिळाले. यंदा मुंबईमध्ये फटाके वाजविण्याचे प्रमाण 70 टक्क्यांनी कमी झाल्याचे रामदास कदम म्हणाले.