‘झाड तुमचं, नावही तुमचंच मात्र संगोपन आमचं’; वृक्षसंवर्धनाचा एक अभिनव उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 11:50 AM2020-06-11T11:50:12+5:302020-06-11T11:57:30+5:30
रानमळा गावात गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सामाजिक वनीकरनाचे काम उत्तमरीत्या सुरू
युगंधर ताजणे
पुणे : वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे संत तुकाराम महाराज यांच्या या ओळीला सार्थक रुप देण्याचे काम खेड तालुक्यातील रानमळा ग्रामपंचायतीने हाती घेतले आहे. वास्तविक बिहार पॅटर्न या नावाने ओळखला गेलेला हा उपक्रम या गावाने आपल्याकडे 'झाड तुमचं, नावही तुमचंच संगोपन मात्र आमचं' या नावाने सुरू केला आहे. 200 झाडे लावण्याचे उद्धिष्ट समोर आहे. अशातच आतापर्यत 39 वृक्षप्रेमी नागरिकांनी 'ट्री गार्ड' देऊन त्यांचा उत्साह वाढवला आहे.
रानमळा गावात गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सामाजिक वनीकरनाचे काम उत्तमरीत्या सुरू आहे. त्यांनी सुरू केलेल्या रानमळा पॅटर्नची शासनाने देखील इतर गावाने देखील त्यांच्या सामाजिक कामाचे अनुकरण करावे यासाठी दोन 'जी आर' प्रसिद्ध केले आहेत. यंदा या गावातील नागरिक, पर्यावरण प्रेमी यांनी वृक्षसंवर्धनाचा एक आगळा वेगळा उपक्रम समोर आणला आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने प्रत्यक्ष कामास जुलै महिन्यात सुरूवात होणार आहे. या उपक्रमात रस्त्याच्या दोन्ही बाजूला 200 झाडे लावण्यात येणार आहे. त्या झाडाच्या संरक्षणासाठी लागणारे 'ट्री गार्ड' वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी, काही सामाजिक संघटना यांनी उपलब्ध करून द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून 200 पैकी 39 झाडासाठी लागणारे ट्री गार्डचा प्रश्न सुटला असल्याची माहिती रानमळा पॅटर्न सुरू करणारे व पर्यावरणप्रेमी पी टी शिंदे गुरुजी यांनी दिली. ते म्हणाले, गावात गेल्या 24 ते 25 वर्षांपासून पर्यावरणाचे आणि सामाजिक वणीकरणाचे काम लोकसहभागातून सुरू आहे. अनेकजण त्यात सहभागी होत आहेत.
२०० झाडे लावण्याचे उद्धिष्ट आहे. आता ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी यांचा सहभाग लक्षात घेता भविष्यात पुन्हा नवीन 200 झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेऊ असा विश्वास रानमळा गावकऱ्यांना आहे. सध्या दोन प्रकल्प सुरू आहेत. एका माणसाला एका दिवसाला ,28 किलो ऑक्सिजन लागतो .एक झाड एका दिवसात 7 किलो ऑक्सिजन देते. म्हणजेच एका माणसाला रोज 4 झाडे लागतात.
रोजगार हमी योजनेअंतर्गत या झाडांची काळजी घेण्यासाठी माणसे नेमण्यात आली आहेत. गावातील माणसांना रोजगार मिळावा या उद्देशातून शासन हा उपक्रम हाती घेते. सध्या शहरातून आलेल्या व्यक्तीकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्याकडून आर्थिक सहकार्य मिळते आहे. त्या झाडांना कमीतकमी तीन वर्षे पाणी घालणे ,त्यांची निगा राखणे ही सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासनाच्या ' सामाजिक वनीकरण ' विभागाच्या सहकार्याने रानमळा ग्रामस्थ घेत आहोत .एका ट्री गार्ड चा खर्च अकराशे रुपये इतका आहे. यात अनेक वृक्षप्रेमी संघटना, संस्था, व्यक्ती आपला सहभाग नोंदवत आहेत. याचे समाधान आणि आनंद वाटतो.
- पी टी शिंदे ( वनश्री पुरस्कार विजेते, रानमळा पॅटर्नचे निर्माते )