पाण्याच्या नियोजनामुळे खडकाळ रानात जगवली झाडं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:12 AM2021-03-16T04:12:28+5:302021-03-16T04:12:28+5:30
खोडद : हिवरे खुर्द येथील वनजमिनीत वनखात्याच्या वतीने लावलेली झाडं एक वर्षांची झाली आहे.वाखणण्याजोगी बाब म्हणजे या साडेपाच हेक्टर ...
खोडद : हिवरे खुर्द येथील वनजमिनीत वनखात्याच्या वतीने लावलेली झाडं एक वर्षांची झाली आहे.वाखणण्याजोगी बाब म्हणजे या साडेपाच हेक्टर खडकाळ रानात पाण्याचे दुर्भिक्ष्य असतानाही उपलब्ध असलेल्या पाण्याचे उत्तम नियोजन करून सुमारे पाच हजार झाडं हिरवीगार झाली आहेत.
वनपरिमंडल अधिकारी मनीषा काळे यांनी ही झाडं जगविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.
येथील वनजमिनीत पिंपळ,वावळा,शिसू,लिंब,करंज,वड,कांचन, काशीद असे पाच हजार विविध जातींच्या झाडांचे वृक्षारोपण गेल्या वर्षी करण्यात आले होते.
वनरक्षक कांचन ढोमसे आणि सुधीर भुजबळ यांनी देखील मनीषा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या झाडांची देखभाल केली आहे.
येथील परिसर खडकाळ असल्याने या परिसरात पाण्याचे स्त्रोत कमी आहेत.येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते.या खडकाळ रानावर खरं तर झाडं जगवणं म्हणजे मोठं आव्हान आहे.मात्र अशा परिस्थितीतही केवळ पाण्याचे उत्तम नियोजन करून प्रत्येक झाडापर्यंत पाणी पोहचवले आहे.
वनखात्याच्या या वनजमिनीत दगडाच्या दोन खाणी आहेत एक खासगी क्षेत्रात एक आशा एकूण तीन खाणी आहेत.गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे या खाणींमध्ये बऱ्यापैकी पाणी साठा झाला होता.पाण्याची मोटर वापरून रबरी पाईप द्वारे या खाणींमधील पाणी प्रत्येक झाडाला घालण्यात आले.यापूर्वी या ओसाड माळरानावर एकही झाड नव्हतं पण आता लावलेल्या या झाडांनी हा परिसर चांगलाच बहरला आहे.
समृद्ध मानवी जीवनासाठी समृद्ध पर्यावरण देखील आवश्यक आहे.वृक्षारोपण हा केवळ शासनाचा उपक्रम न राहता ही लोकचळवळ व्हावी.गावागावातील पर्यावरण प्रेमी युवकांनी वृक्षारोपण चळवळीसाठी पुढे यावे.या वर्षी वृक्षारोपण करण्यासाठी प्रत्येक गावातील युवकांनी आणि ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा. - मनीषा काळे, वनपरिमंडल अधिकारी, नारायणगाव
१५ खोडद १
हिवरे खुर्द येथील खडकाळ वनजमिनीती रोपण केलेल्या वृक्षांना पाणी देताना वनपरिमंडल अधिकारी मनीषा काळे.