झाडे तोडणार, पुराचा धोका वाढणार; स्वच्छ पाणी सोडा, मगच नदीकाठ सुधार हाती घ्या-नीलम गोऱ्हे
By श्रीकिशन काळे | Published: May 8, 2023 02:47 PM2023-05-08T14:47:26+5:302023-05-08T14:50:04+5:30
पुणे महापालिकेच्या ‘आरएफडी’ (रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट) प्रकल्पाविषयी अनेक त्रुटी असल्याने नदीचे नुकसान होणार
पुणे : पुणे महापालिकेच्या ‘आरएफडी’ (रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट) प्रकल्पाविषयी अनेक त्रुटी आहेत. त्यातून नदीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे परीक्षण ‘नीरी’ या संस्थेकडून करून घ्यावे, या प्रकल्पामुळे नदीचे डोहात रूपांतर होईल, नदीपात्र अरूंद होत असल्याने पुराचा धोका वाढणार आहे, या गोष्टींबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.
नदीकाठ पुनरूज्जीवन प्रकल्पाबाबत डॉ. गोऱ्हे यांना यापूर्वी नदीप्रेमींनी माहिती दिली होती. त्यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी प्रधान सचिव, महापालिका आयुक्त, नगर विकास विभाग सचिव यांना पत्र पाठवून कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. तसेच काय कार्यवाही केली, ते कळवावे, असेही पत्रात नमूद आहे. पुणे शहराच्या विविध भागातून नदीत येणारे मैलापाणी प्रक्रिया करून चांगले पाणी नदीपात्रात सोडा व नंतरच नदीकाठ सुधार हाती घ्यावे. नदीकाठ सुधार अंतर्गत नदी पात्रातील पूल पाडण्यात येणार असून, रस्तेही बंद करण्यात येणार आहेत. यावर उपाय काढण्याची आवश्यकता आहे. हजारो झाडेही तोडली जाणार आहेत. ते तत्काळ थांबवावे व तशा सचूना द्याव्यात, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले आहे.
कोणतीही वृक्षतोड करू नये
नीरी सारख्या संस्थेकडून प्रकल्पाचे संभाव्य पर्यावरण आघात परीक्षण करून घ्यावे. पर्यावरण विषयक काम करणाऱ्या संस्थांची मते विचारात घ्यावीत. त्यांना बैठकांना बोलवावे. महापालिकेने नागरिकांची, संस्थांच्या कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी बैठक घ्यावी. याविषयी जनसुनावणी घेऊन मगच प्रकल्पाला सुरवात करावी. तोपर्यंत कोणतीही वृक्षतोड करू नये, असे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले आहेत.