पुण्यातील तरुणीची जबरदस्त कामगिरी; कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे मोबाईल ॲप केले विकसित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 11:29 AM2020-12-29T11:29:34+5:302020-12-29T12:02:03+5:30
प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावशाली पाऊल
पुणे : आपण दररोज विनाकारण कार्बन तयार करतो आणि तो हवेत जाऊन प्रदूषणात भर घालतो. पण आता आपण आपले कार्बन कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्यासाठी एक मोफत ॲप पुण्यातील तरूणीने केले असून, ते डाऊनलोड केल्यास तुम्ही दररोज किती कार्बन कमी करू शकता, ते त्यात दिसून येईल. परिणामी प्रदूषण कमी करण्यासाठी मदत होणार आहे.
प्राची शेवगावकर या तरूणीने ‘cool the globe हे ॲप तयार केले आहे. प्ले स्टोअरमध्ये हे कोणालाही डाऊनलोड करता येईल आणि त्याचा वापर करता येईल. ती या विषयी म्हणाली,‘‘ मी जागृती यात्रेत सहभागी झाले होते. तेव्हा सोनम वांगचूक यांच्याशी ओळख झाली. त्यांच्या व्यक्तिमत्वाने मला प्रभावीत केले. त्यानंतर मी निसर्ग संवर्धनासाठी काही तरी करू शकेन का ? यावर विचार करू लागले. मला याबाबत काहीच माहिती नव्हते. मग मी माझ्या बाबांना याविषयी विचारले. त्यांनी सोपा मार्ग सांगितला. तु स्वत: कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न कर. मग मी ठरवलं की, काय केले म्हणजे मी कार्बन उत्सर्जन कमी करू शकेन. मी जर स्वत:च्या वाहनापेक्षा सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला, मांसाहार सोडला तर किती कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होईल. त्याबाबत मग मी आणि माझ्या बाबाने हे ॲप तयार केले. यातून सामान्य माणूस सुध्दा हवामान बदलावर स्वत:चे योगदान देऊ शकतो.’’
कसे थांबवाल कार्बन उत्सर्जन ?
जर मी दहा किलोमीटर वाहनाऐवजी सायकलने प्रवास केला, तर मी २.३ किलो कार्बन वातावरणात जाण्यापासून वाचविला. जर मी दोन तास टीव्ही पाहिला नाही, तर मी ०.१२ किलो कार्बन उत्सर्जन होण्यापासून वाचविले. मला मांसाहार आवडतो, पण महिनाभर मी ते खाल्ले नाही, तर महिन्याला २० किलो कार्बन उत्सर्जन थांबविले, असे प्राची म्हणाली.
नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा
तीन वर्षे ‘cool the globe’ या ॲपवर काम केले. हा प्रकल्प पूर्ण झाला असला, तरी त्याचे काम आता सुरू होणार आहे. ज्यांना हवामान बदलावर काम करायचे आहे, त्यांनी याचा वापर करून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. आपले लहान-लहान बदलच हवामान बदलावर परिणामकारक ठरणार आहेत, असे प्राची म्हणाली.