लोकांच्या आवडीकडे कलाकारांचा कल वाढतोय : वसंत काब्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 03:01 PM2018-12-12T15:01:32+5:302018-12-12T15:02:02+5:30
भारतीय शास्त्रीय संगीत हे ऐकून काय चांगले असते हे कळेल; मात्र गुरुशिवाय ते आत्मसात करता येणार नाही
पुणे : संगीतामध्ये खूप शक्ती आहे, मात्र, त्यामध्ये मन आणि भावना असणे गरजेचे आहे. पूर्वी लोक संगीतासाठी वेडे व्हायचे, लोकांकडे चांगल्या संगीतासाठी वेळ होता. कलाकारांमध्ये आदानप्रदान व्हायचे. आता या गोष्टी बदलल्या आहेत. आता संगीताच्या सुरांतील ताकद संपत चालली आहे. लोकांना जे आवडेल, ते वाजवण्याकडे कल वाढला आहे, असे मत सरोदवादक पंडित बसंत काब्रा यांनी व्यक्त केले. चांगले शिकले पाहिजे. रियाझ केला पाहिजे. स्वत:ला जे आवडेल, तेच वाजवले पाहिजे. ते लोकांना आपोआप आवडू लागेल. भारतीय शास्त्रीय संगीत हे ऐकून काय चांगले असते हे कळेल; मात्र गुरुशिवाय ते आत्मसात करता येणार नाही असेही त्यांनी सांगितले.
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये ख्यातनाम कलाकारांबरोबरील संवादात्मक कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणा-या ‘अंतरंग’ या कार्यक्रमामध्ये यावर्षी सतारवादक अन्नपूणार्देवी यांचे शिष्य व सरोदवादक पं. बसंत काब्रा यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. मंगेश वाघमारे यांनी बसंत काब्रा यांची मुलाखत घेतली. गणेशखिंड रस्त्यावरील राहुल थिएटरजवळील सवाई गंधर्व स्मारकामध्ये सकाळी झालेल्या या कार्यक्रमाला आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी हे देखील उपस्थित होते.
काब्रा म्हणाले, ‘घरामध्येच संगीताची परंपरा होती. वडील, काका वाजवायचे. घरी सतत सरोद ऐकू यायची. अली अकबर खॉं यांचे येणे जाणे होते. त्यामुळे पुढे अन्नपूर्णा देवी अर्थात गुरु मॉं यांच्याकडे शिष्य म्हणून दाखल झालो. अन्नपूर्णा देवी यांना संगीत म्हणजे, पूजा वाटायची. त्या म्हणायच्या, राग हे मंत्रासारखे वाजवले, म्हटले पाहिजेत. त्यांचा शिस्तीवर भर होता. अगोदर माहित असलेले सगळे विसरायला अन्नपूर्णा देवी यांनी सांगितले आणि पुढे ‘यमन’ रागापासून शिक्षण सुरु झाले.’
यावेळी पं. काब्रा यांनी मालकंस, मारवा रागातील काही तुकडे सरोदवर सादर केले. ‘षड्ज’ या कार्यक्रमांतर्गत, दिग्दर्शक एस. बी. नयमपल्ली यांनी दिग्दर्शित केलेला ‘पं. विष्णू दिगंबर पलुस्कर’ हा माहितीपट आणि ‘पं. बिरजू महाराज’, हा चिदानंद दासगुप्ता दिग्दर्शित फिल्म डिव्हिजनने तयार केलेले माहितीपट दाखविण्यात आले.