शहरातील खासगी रुग्णालयांकडून लसीकरण प्रक्रियेची ‘ट्रायल रन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:10 AM2021-05-17T04:10:00+5:302021-05-17T04:10:00+5:30
पुणे : शहरातील काही मोठ्या खासगी रूग्णालयांना थेट लस उत्पादक कंपन्यांनी हजारोंच्या संख्येने लस देण्याबाबतचे निश्चित केले आहे. यापैकी ...
पुणे : शहरातील काही मोठ्या खासगी रूग्णालयांना थेट लस उत्पादक कंपन्यांनी हजारोंच्या संख्येने लस देण्याबाबतचे निश्चित केले आहे. यापैकी काही खाजगी रूग्णालयांकडून लसीकरण प्रकियेचा अभ्यास (ट्रायल रन) ही सुरू केला आहे़
शहरातील लसीकरणाचा वेग लसअभावी एकीकडे मंदावला असतानाच, शहरात काही मोठ्या खासगी रूग्णालयांना थेट कंपन्यांकडूनच लस प्राप्त होणार आहे. या लस मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्याकडे प्रत्यक्षात येतील असे सांगितले गेले आहे़ यामुळे काही रूग्णालयांनी लसीकरणाची ट्रायल रनसुध्दा सुरू केली आहे. वयोगटानुसार लसीकरण कसे करावे, कोविन पोर्टलवर नोंदणी कशी असावी, नावनोंदणी प्रक्रिया सुलभरित्या उपलब्ध करून देता येईल का याचा अभ्यास करण्यासाठी खासगी रूग्णालयांचे काही वैद्यकीय अधिकारी सध्या महापालिकेत ये-जा करीत आहेत़
महापालिकेला जोपर्यंत राज्य शासनाकडून लस प्राप्त होत नाही तोपर्यंत काहीच हालचाल करता येत नाही. मात्र आता विविध कंपन्यांच्या लस खुल्या बाजारात उपलब्ध होत असल्याने, शहरात सहज लस मिळेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे़
कोरोनापासून संरक्षण कवच निर्माण होण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. त्यामुळे शहरातील मोठा वर्ग हा लसीचे डोस विकत घेण्यास तयार आहे. त्यामुळे खाजगी रूग्णालयात लस उपलब्ध झाल्यावर ती विकत का होईना मिळली याचे मोठे समाधान मिळणार आहे. शहरातील लसीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याने कोरोनाविरूध्दचे मोठे सुरक्षा कवच तयार करण्यात यश येईल, असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रात व्यक्त केला जात आहे.