मार्च महिन्यापासूनच आदिवासी बांधवांना पाण्यासाठी संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:09 AM2021-03-22T04:09:45+5:302021-03-22T04:09:45+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे खोरे हा परिसर मुसळधार पडणाऱ्या पावसाचे माहेरघर समजले जाते.पावसाळ्यामध्ये चार ...
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे खोरे हा परिसर मुसळधार पडणाऱ्या पावसाचे माहेरघर समजले जाते.पावसाळ्यामध्ये चार महिने मुसळधार पाऊस पडूनही उन्हाळ्यामध्ये या भागातील आदिवासी जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागते. वर्षानुवर्ष या भागातील आदिवासी बांधवांना दुष्काळाचे हाल सोसावे लागतात.मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे म्हाळुंगे कुशिरेदरम्यान असणारा डिंभे धरणाचा फुगवटा हा मोठ्या प्रमाणात भरला जातो. त्याचप्रमाणे या पाणलोट क्षेत्रामध्ये पाटण- पिंपरी हद्दीमध्ये छोट्या छोट्या कोल्हापुरी पद्धतीने बंधारे बांधून पाणी अडविले जात आहे. त्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यातून उपसा सिंचन करून या भागामध्ये बागायत पद्धतीची शेती केली जात आहे. परंतु या वर्षी या परिसरामध्ये पडणाऱ्या वरूणराजाने लवकरच काढता पाय घेतला त्याचप्रमाणे खाली कालव्याद्धारे मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्यामुळे डिंभे धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे हे पाणलोट क्षेत्र आता कोरडे होऊ लागले आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाटण खोऱ्यामध्ये असणाऱ्या सावरली, साकेरी,नानवडे,ढकेवाडी,तर आहुपे खोऱ्यातील नानवडे आघाणे पिंपरगणे असाणे ह्या गावची मेनुंबरवाडी या गावांच्या उशाला डिंभे धरण असून या लोकांच्या घशाला कोरड कायमची पडली आहे.या गावांना मोठ्या प्रमाणात दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र व या धरणाचा फुगवटा या गावांच्या हाकेच्या अंतरावर असूनही या गावांतील आदिवासी लोकांना वाटीने झऱ्यातून पाणी टिपावे लागत आहे.सध्या चालू असलेल्या मार्च महिन्यापासूनच आदिवासी बांधवांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, अजून पुढील तीन महिने कसे जाणार, अशी चिंता आदिवासी जनतेसमोर उभी राहिली आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर परिसरात पाटण खोऱ्यामध्ये असलेले डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र या वर्षी झपाट्याने कोरडे होऊ लागले आहे.
( छायाचित्र- संतोष जाधव )