ताडपत्री चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती
By admin | Published: June 22, 2017 07:23 AM2017-06-22T07:23:50+5:302017-06-22T07:23:50+5:30
आषाढी वारीतील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ताडपत्री या भेटवस्तू खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय स्थायी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : आषाढी वारीतील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ताडपत्री या भेटवस्तू खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत झाला. खरेदीत दिरंगाई का झाली, वेळापत्रक का तयार केले नाही, सबव्हाऊचर तपासणी, रसायन शाळेचा तपासणी अहवाल सादर झाल्यानंतरच ठेकेदाराला रक्कम अदा करावी, जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेश अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिले आहेत.
महापालिकेच्या वतीने संत ज्ञानेश्वरमहाराज पालखीसोहळा आणि संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुखांना भेटवस्तू देण्यात येते. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेत विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती गैरव्यवहार प्रकरण गाजले होते. त्यानंतर भाजपाची सत्ता आल्यानंतरही ताडपत्रीखरेदीत घोटाळा झाल्याचे प्रकरण उघड झाले. बाजारात दोन हजार चारशे रुपयांपर्यंत मिळणारी ताडपत्री भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा नारा देणाऱ्या भाजपाने तीन हजार चारशे बारा रुपयांना खरेदी केली असून, साडेसहाशे ताडपत्री खरेदी केली होती. त्यासाठी वाढीव दरानुसार २२ लाख सजरा हजार आठशे रुपये खर्च अपेक्षित होता. तर, बाजारभावानुसार दोन हजार चारशे रुपये दर अपेक्षित धरल्यास सुमारे पंधरा लाख साठ हजार रुपये खर्च अपेक्षित होता. यामध्ये सुमारे सहा लाख साठ हजारांचा आरोप झाला होता. याबाबत लोकमतनेही स्टिंग आॅपरेशन करून वाढीव दराने ताडपत्री खरेदी झाल्याचे निदर्शनास आणले होते. ताडपत्री खरेदी २५ लाखांच्या आत असल्यामुळे पालिका आयुक्तांच्या अधिकारात केली. त्यामुळे ताडपत्री खरेदीचा विषय माहितीसाठी स्थायी समितीसमोर ठेवला होता. यावर समितीनेही या प्रकरणाबाबत प्रशासनास प्रश्न विचारले. ताडपत्री खरेदी प्रकरणाची सविस्तर चौकशी झाल्याशिवाय संबंधित पुरवठादारास त्याचे देयक देऊ नयेत, अशा सूचना स्थायी समितीने दिल्या. याबाबत बोलताना अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ताडपत्री खरेदीची चौकशी करण्याचा निर्णय झाला. अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, लेखाप्रमुख राजेश लांडे, दक्षता समितीचे सतीश इंगळे यांची त्रिसदस्यीय समिती ताडपत्री घोटाळ्याची चौकशी करणार आहे. त्यांच्याकडून सविस्तर अहवाल मागविला आहे. त्रिसदस्यीय समिती ताडपत्रीच्या बिलाची पडताळणी करणार आहे. निविदा प्रक्रिया राबविण्यास विलंब का झाला, याची सविस्तर चौकशी करणार आहे. महिन्याभरात समितीचा अहवाल येणे अपेक्षित आहे. व्हॅट व्हेरिफिकेशनबाबतही माहिती घेण्यात येणार आहे. तसेच ताडपत्रीचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविले आहेत.’’
दिरंगाईचीही चौकशी
१८ एप्रिलला महापौर नितीन काळजे यांनी पालखीसोहळ्याच्या नियोजनासंदर्भात बैठक घेतली होती. त्या वेळी स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी उत्सव-महोत्सव हे दर वर्षीच येत असतात. त्यामुळे त्याचे कॅलेंडर करावे, तसेच वारकऱ्यांना कोणती वस्तू द्यायची याबाबत नियोजन झाले होते. त्यानंतर २६ मे प्रशासनाने उशिरा निविदा काढण्यातील गौडबंगाल काय, याची चौकशी करण्यात येणार आहे. विलंबाचे कारणही शोधले जाणार आहे.