आदिवासी कुटुंबांना रेशनिंग कार्डवर केरोसीन मिळणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:08 AM2021-05-29T04:08:47+5:302021-05-29T04:08:47+5:30
आंबेगाव तालुक्याचा पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे खोरी ही अत्यंत डोंगर दर्याखोर्यांमध्ये वसली आहेत. उन्हाळा, पावसाळ्यात या ...
आंबेगाव तालुक्याचा पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे खोरी ही अत्यंत डोंगर दर्याखोर्यांमध्ये वसली आहेत. उन्हाळा, पावसाळ्यात या भागांमध्ये विजेचा लपंडाव चालू असतो. या भागातील आदिवासी बांधव दिवसरात्र उजेडासाठी राॅकेलच्या बत्तीचा वापर करत असतात. विशेषत: पावसाळ्यांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यास आदिवासी भागातील काही गावे महिना महिना अंधारामध्ये असतात. यासाठी या भागामध्ये केरोसीन मिळणे आवश्यक आहे; परंतु गेले दीड-दोन वर्षांपासून या भागामध्ये रेशनिंग कार्डवर राॅकेल मिळत नाही. ह्यामुळे आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सध्या ह्या भागामध्ये उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्याचप्रमाणे विजेचा लपंडावही चालू आहे. मागील आठवड्यामध्ये चार-पाच दिवस वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे आदिवासी जनतेला रात्रंदिवस अंधारात घालवावी लागली.
सध्या रात्रीच्या वेळी सर्प, विंचू या विषारी हिंस्त्रकांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या अंधाराचा फायदा घेऊन या भागामध्ये रात्रीच्या वेळी सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. पाटण खोर्यामध्ये डिंभे धरणाचे विस्तीर्ण असे पाणलोट क्षेत्र पसरले आहे. डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र असल्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विषारी सर्प आढळतात. त्यामुळे या भागात सर्पदंशाचे प्रमाणही जास्त आहे. पावसाळ्यामध्ये विजेचा तांत्रिक बिघाड झाला असता, या भागातील आदिवासी बांधवांना महिना महिना भर अंधारात राहावे लागते. आदिवासी भागात दरवर्षी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्याने वीजपुरवठा खंडित होतो. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर विद्युत विभागाकडून दहा ते पंधरा दिवस वीज सुरळीत होत नाही.
पावसाळा सोडून इतर दिवशीही काही भागामध्ये वीजपुरवठा सुरळीत नसतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रकाशासाठी दिवा, कंदील लावण्यासाठी केरोसीनशिवाय पर्याय नसतो. त्याचप्रमाणे आदिवासी भागातील बहुतेक कुटुंबे गॅसधारक नाहीत. जे गॅसधारक आहेत, त्यांना गॅस टाकी भरण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने गॅसच्या टाक्या रिकाम्या अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे आदिवासी भागातील सर्व कुटुंबांना रेशनिंग कार्डवर विशेष बाब म्हणून केरोसीन उपलब्ध करून द्यावे, अशा आशयाचे निवेदन आंबेगाव तालुका केरोसीन व रेशनिंग संघटनेने लेखी निवेदनाद्वारे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याचे संघटनेचे अध्यक्ष सुरेश घोलप यांनी सांगितले.
तळेघर वार्ताहार संतोष जाधव