हिरडा खरेदी बंद झाल्याने आदिवासी शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:10 AM2021-05-20T04:10:40+5:302021-05-20T04:10:40+5:30
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील शेतकऱ्यांकडे हिरडा वनस्पतीची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या आदिवासी भागात हिरडा काढणी ...
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील शेतकऱ्यांकडे हिरडा वनस्पतीची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या आदिवासी भागात हिरडा काढणी सुरू आहे. मात्र शासनाकडून गेल्या पाच-सहा वर्षांपासून हिरडा खरेदी बंद असल्यामुळे आदिवासी शेतकरी बांधवांचे नुकसान होत आहे. त्यामुळे तातडीने हिरडा खरेदी सुरू करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
आदिवासी शेतकऱ्यांचा सर्वच प्रकार शेतीमाल खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु आदिवासी विकास महामंडळ आदिवासी शेतकऱ्यांकडून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून आदिवासी शेतकऱ्यांचा बाळहिरडा माल खरेदी केला नाही. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. बाळ हिरडा खरेदी सुरू करावी, यासाठी अनेकवेळा आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांच्याकडे आदिवासी शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाव्दारे मागणी केली आहे. मात्र महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही की खरेदी सुरू केलेली नाही.
सध्या मे महिन्यात बाळ हिरड्याचा सिझन सुरू असून विक्रीही शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. परंतु शेतकऱ्यांचा माल आदिवासी विकास महामंडळ करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच आदिवासी विकास महामंडळाच्या विकासाच्या योजना बंद केल्या आहेत. यामध्ये वरई, सावा, भात, नाचणी आदी सर्व प्रकारची धान्य खरेदी बंद आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचा फार मोठ्या प्रमाणात तोटा होत असून अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचा बाळ हिरडा खरेदी करण्यासाठी तातडीने आदेश आदिवासी विकास महामंडळाला देण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहंडुळे कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक मारुती केंगले व परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी केली आहे.
--
फोटो क्रमांक : १९ तळेघर आदिवासी हिरडा खरेदी
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये आदिवासी विकास महामंडळाने हिरडा खरेदी बंद केल्यामुळे वाळवून साठवणूक करताना आदिवासी शेतकरी.
( छायाचित्र : संतोष जाधव )