आदिवासींचा ‘रास्ता रोको’
By admin | Published: January 23, 2016 02:36 AM2016-01-23T02:36:19+5:302016-01-23T02:36:19+5:30
पडकईचे थकीत रक्कम द्या, रीडिंगप्रमाणे वीजेची बिलं काढा आदी मागण्या करीत आंबेगाव तालुक्यातील आदीवासींनी शुक्रवारी
तळेघर : पडकईचे थकीत रक्कम द्या, रीडिंगप्रमाणे वीजेची बिलं काढा आदी मागण्या करीत आंबेगाव तालुक्यातील आदीवासींनी शुक्रवारी मंचर भीमाशंकर रस्त्यावर तळेघर येथे रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला.
अखिल भारतीय किसान सभा पुणे जिल्हा समितीच्या आंबेगाव तालुका संघटनेच्या वतीने विविध समस्यांबाबत हे आंदोलन केले. रॅली काढत तब्बल दोन तास रस्त्यावर ठिय्या मारला.
रीडिंग न घेता अवास्तव वीज बिले बंद करून रीडिंगप्रमाणे बिल देण्यात यावे. बिल कमी करण्यासाठी पहिल्या गुरुवारी तळेघर येथे अधिकारी नेमण्यात यावा. पेन्शनधारकांसाठी तलाठ्याच्या पंचनामा ही जाचक अट रद्द कराव्यात, आदिवासी भागामध्ये बी.एस.एन.एल. कंपनीचा अनागोंदी कारभार बंद करून नियमित विस्कळित होणारी सेवा सुरळीत व्हावी. आदिवासी भागातील प्रत्येक गावात रोजगार हमी योजना सुरू करावी. आदिवासी भागांमध्ये तलाठी, ग्रामसेवक यांच्या चालणाऱ्या मनमानी कारभारांना त्वरित आळा बसावा. आदी मागण्या यावेळी केल्या.
या रास्ता रोकोसाठी आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण, आहुपे खोऱ्यातील तमाम आदिवासी बांधव उपस्थित होते. या वेळी कामगार तलाठी एम. जे. सुडीत, महावितरणाचे प्रमोद मारबते, कृषी खात्याचे डी. एम. गायकवाड यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या वेळी अखिल भारतीय किसान सभा आंबेगाव तालुका उपाध्यक्ष राजेंद्र घोडे, सचिव अशोक पेकारी, अशोक जोशी, पाटणचे सरपंच महादू मावळे, मच्छिंद्र कढण, बबन मावळे, दिलीप मुदगुण उपस्थित होते. (वार्ताहर)दीड वर्ष होऊनही पडकईचे पैैसे नाहीत
आदिवासी भागांमध्ये आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव यांच्याकडून आदिवासी भागात शेतीच्या कामासाठी कृषी विभाागामार्फत पडकई ही योजना राबविली जाते.
सन २०१३-१४ या वर्षामध्ये कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून अंदाजपत्रक तयार करून योजना मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना कामे करावयास सांगितली. शेतकऱ्यांनी कामे पूर्ण करूनही दीड वर्षामध्ये अद्यापही त्यास पैसै मिळाले नाहीत.
पैसे न मिळाल्यामुळे त्या भागाताील आदिवासी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मजूर पैशांसाठी शेतकऱ्यांच्या वारंवार दारात आल्यामुळे शेतकऱ्यांनी बैल, म्हैस, सोने तारण ठेवून कर्ज काढून मजुरांचे पैसे दिले आहेत. या शेतकऱ्यांना पडकईचे लवकरात लवकर पैसे मिळावेत.