सलग 14 तास अभ्यास करुन आंबेडकरांना अभिवादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 16:34 IST2019-12-06T16:32:57+5:302019-12-06T16:34:53+5:30
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सलग 14 तास अभ्यास करुन विद्यार्थ्यांनी अनाेख्या पद्धतीने आदरांजली वाहिली.

सलग 14 तास अभ्यास करुन आंबेडकरांना अभिवादन
पुणे : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तब्बल 14 तास अभ्यास करत असायचे. त्यांना त्यांची पुस्तके सर्वात प्रिय हाेती. आंबेडकरांच्या याच विचारांना अभिवादन करत पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील आंबेडकरराइट्स स्टुडंट्स ऑर्गनायझेशनच्या वतीने विद्यार्थ्यांनी 14 तास अभ्यास करत अनाेख्या पद्धतीने आंबेडकरांना अभिवादन केले. गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात शेकडाे विद्यार्थ्यांनी सहभाग नाेंदविला.
महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी त्यांना अनाेख्या पद्धतीने अभिवादन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सलग 14 तास अभ्यास केला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी चहा नाश्त्याची साेय करण्यात आली हाेती. तसेच विद्यार्थ्यांना वाचनासाठी आंबेडकरांवरील तसेच विविध सामाजिक विषयांवरील पुस्तके वाचण्यास देण्यात आली. फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवींद्रसिंह परदेशी, उपप्राचार्य प्रा. प्रकाश पवार व कार्यक्रमाचे प्रमुख प्रा. डॉ. चंदनशिवे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
संध्याकाळी उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटना, महात्मा फुले यांचे खंड, अण्णाभाऊ साठे यांचे फकीरा कादंबरी, कॉ.गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता? आदी पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. त्याचबराेबर या उपक्रमातील सहभागाबद्दल प्रमाणपत्र देखील देण्यात आले.