समताधिष्ठित ध्यासपर्वाचा अंत, भाई वैैद्य यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 04:13 AM2018-04-05T04:13:47+5:302018-04-05T04:13:47+5:30

जातीयुद्ध, धर्मयुद्ध थांबविण्यासाठी बाबासाहेबांचा कृती कार्यक्रम राबवावा, सर्व चळवळींची एकजूट व्हावी, अशी भार्इंची इच्छा होती. त्यांच्या निधनाने मूल्याधिष्ठित आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीच्या ध्यासपर्वाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत मान्यवरांनी ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृह राज्यमंत्री भाई वैद्य यांच्या आठवणींना उजाळा दिला.

 Tribute to brother Vaideh, end of equanimity | समताधिष्ठित ध्यासपर्वाचा अंत, भाई वैैद्य यांना श्रद्धांजली

समताधिष्ठित ध्यासपर्वाचा अंत, भाई वैैद्य यांना श्रद्धांजली

googlenewsNext

पुणे - जातीयुद्ध, धर्मयुद्ध थांबविण्यासाठी बाबासाहेबांचा कृती कार्यक्रम राबवावा, सर्व चळवळींची एकजूट व्हावी, अशी भार्इंची इच्छा होती. त्यांच्या निधनाने मूल्याधिष्ठित आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीच्या ध्यासपर्वाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत मान्यवरांनी ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृह राज्यमंत्री भाई वैद्य यांच्या आठवणींना उजाळा दिला. सुनीती सु.र. यांनी नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांचा शोकसंदेश वाचून दाखविला. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्यासह डॉ. अभिजित वैद्य, सोशलिस्ट पार्टी (इंडिया)चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रेमसिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या इला दलवाई म्हणाल्या, ‘‘मेहरुन्निसा दलवार्इंपाठोपाठ भाईही गेले. मुस्लिम पुरोगामी चळवळ कशी असावी, याबाबत भार्इंचे विचार ठोस होते. मात्र, आपले विचार त्यांनी कधीच कोणावर लादले नाहीत. त्यांच्याकडे चळवळीसाठी दूरदृष्टी होती. आमच्या दोन्ही कुटुंबांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. गेल्या काही काळात मुस्लिम पुरोगामी चळवळीबाबत भार्इंनी मलाही मार्गदर्शन केले. हमीद दलवार्इंना जगाला परिचित करून देण्याचे श्रेय त्यांना जाते. दलवार्इंच्या माहितीपटाच्या कामात ते सहभागी झाले. त्यांच्या निधनाने मुस्लिम पुरोगामी चळवळीला कायम उणीव भासणार आहे.’’
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ न. म. जोशी म्हणाले, ‘‘भार्इंनी कायम समाजाच्या समतेचा विचार मांडला. कळत्या वयापासून मावळत्या वयापर्यंत समाजवादावर अविरत निष्ठा असणारे ते कलासक्त कर्मयोगी होते. ते समाजाच्या विशाल वर्गाचे शिक्षक होते. समाजाच्या वाळवंटात समाजवादाची स्वस्तिक चिन्हे उमटविण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न
केला.’’
मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सय्यदभाई, एस. एम. जोशी फाउंडेशनचे अभय जोशी, किसान संघर्ष समितीचे सुनीलम, अंनिसचे मिलिंद देशमुख, बाळासाहेब शिवरकर, कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सेवा दलाचे काम घराघरांत हीच श्रद्धांजली
राष्ट्र सेवा दलाचे अल्लाउद्दीन शेख म्हणाले, ‘‘भाई आपल्यात नाहीत ही बाब अजूनही मनाला पटत नाही. ते आमचे खंदे मार्गदर्शक होते. त्यांच्या रूपाने कधीच भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्याशी चर्चा म्हणजे कार्यकार्यांना मेजवानी असायची. त्यांनी दाखविलेल्या वाटेवरून आता चाचपडत चालावे लागणार आहे. सेवा दलाचे काम गावागावांत, घराघरांत पोहोचविणे हीच भार्इंना खरी श्रद्धांजली ठरेल.’’

पुढील काळात देशात जातीयुद्ध आणि धर्मयुद्ध पेटणार आहे, याचा उल्लेख भाई गेल्या काही काळात वारंवार करायचे. या युद्धाचा सामना करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कृती कार्यक्रम राबवावा, अशी त्यांची इच्छा होती.
सध्या देशाचे संविधान धोक्यात आले आहे. असहिष्णुता वाढीस लागली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक चळवळीने वेगळा लढा उभारण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे.
- म. ना. कांबळे

Web Title:  Tribute to brother Vaideh, end of equanimity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.