गिरीश कर्नाड यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली..! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 09:27 PM2019-06-10T21:27:02+5:302019-06-10T21:30:02+5:30

 साहित्य, सिनेमा,नाटक या क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या गिरीश कर्नाड यांचा जीवन प्रवास नक्कीच थक्क करणारा आणि प्रेरणादायी होता..

Tribute to Girish Karnad by dignitaries! | गिरीश कर्नाड यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली..! 

गिरीश कर्नाड यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली..! 

googlenewsNext

गिरीश हा माझा अत्यंत जवळचा मित्र होता. भारतीय रंगभूमीवरील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा तो एकमेव नाटककार होता. आता काय बोलावं सुचतं  नाहीये. त्याची जागा भरून येणं अवघड आहे. एक पोकळी निर्माण झाली आहे- महेश एलकुंचवार, ज्येष्ठ नाटककार
--------------------------------------------------------
सत्तरीच्या दशकात पुण्यातील एफटीआयआयच्या संचालकपदी कार्यरत असल्यापासून गिरीशला मी ओळखत आहे. त्याची अनेक नाटके भारतीय मिथ्यकांवर असली तरी ती कालसुसंगत राहिली आहेत. त्याच्या निधनाने भारतीय आधुनिक रंगभूमीचे चारही  आधारस्तंभ आज आपण गमावले आहेत. कलाकृतीमधून एखादा विचार मांडायला ते कधीही घाबरले नाहीत. त्यांनी स्वत:चे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम जपले. लोकशाहीचे हे मूल्य त्यांनी वारंवार सिद्ध करून दाखविले. गिरीश हे अत्यंत पारदर्शक व्यक्तिमत्व होते. ज्याने नवीन नाटककारांना नेहमीच सहकार्य केले. मी आज वरिष्ठ मित्र आणि तत्वज्ञानी व्यक्तिमत्वास मुकलो आहे- सतीश आळेकर, ज्येष्ठ नाटककार
------------------------------------------------------------
 साहित्य, सिनेमा,नाटक या कला कशा जोपासाव्या तसेच चांगल्या विचारांना प्रवृत्त करेल, अशी कलाकृती कशी घडवायची किंवा विचार कसा करायचा हा संस्कार गिरीशमुळे व्हायचा. गिरीश बुद्धिवादी कलाकार होता. शैक्षणिक दृष्टी त्याच्याकडे होती. गिरीश काय किंवा डॉक्टर लागू काय यांच्या कलेमध्ये बुद्धिप्रामाण्यवाद सतत डोकावतो. गिरीश वागायला साधा होता. आता कलाकार अमुत-तमुक पक्षाचे असतात. गिरीश तसा नव्हता. तो स्वतंत्र अस्तित्व जपणारा होता. तो निर्भीडतेने बोलायचा. एफटीआयआयचा अध्यक्ष म्हणून त्याने कधीही थाट करून घेतला नाही. तो इंग्लंडला गेला नसता तर आम्ही एफटीआयआयला आशियातील उच्च संस्था म्हणून नावारूपाला आणले असते.  -डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते
------------------------------------------------------------
आधुनिक भारतीय रंगभूमीवर विजय तेंडुलकर, मोहन राकेश, बादल सरकार आणि गिरीश कार्नाड हे चार नाटककार झाले. या चौघांमध्ये गिरीश ककार्नाड यांनाच केवळ  ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मात्र हा पुरस्कार तेंडुलकर यांना मिळायला हवा होता इतका मोठेपणा त्यांनी दाखविला होता. पाश्चात्यांच्या प्रभावाखाली भारतीय रंगभूमी होती. परंतु भारतीय लोककलांचा उपयोग आधुनिक सामाजिक जाणिवा व्यक्त करण्याकरिता होईल का? याचा अविरत शोध त्यांनी आपल्या नाटकांमधून घेतला. टिपू सुलतानाचं स्वप्नह्ण या नाटकावरून त्यांचा कर्नाटकमध्ये निषेध झाला होता. पेशवेकालीन तो मोठा नायक होता. पण इतिहासकारांनी नेहमी त्यांना खलनायकच ठरविले.मला  टिपू सुलतान जसा दिसला तसा मांडला पण कर्नाड यांचे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य समाजाने मान्य केले नाही. त्यामुळे कर्नाड यांनाही एक पाऊल मागे घ्यावे लागले. ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे. भारतीय रंगभूमीवरील आज चौथा स्तंभ देखील निखळला- माधव वझे, ज्येष्ठ नाट्य अभ्यासक
----------------------------------------------------------
स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या मूळाचा शोध घेणारे (गोईंग टू द रूट्स) विजय तेंडुलकर, मोहन राकेश, बादल सरकार आणि गिरीश कर्नाड हे चार नाटककार भारतीय रंगभूमीचे आधारस्तंभ होते. गिरीश कार्नाड यांच्या रूपाने यातील चौथा आणि अखेरचा आधारस्तंभ निखळून पडला. इतिहासाचे व्यापक आकलन  त्यांनी आपल्या नाटकांतून मांडले.  त्यांचे तुघलक  नाटक हे तर भारतीय रंगभूमीवरील कळसाध्याय असेच म्हणावे लागेल. वेगवेगळ्या प्रश्नांसदर्भात त्यांनी त्यांची रोखठोक मते मांडली आहेत.   कांडू , चेलूवी  आणि   उत्सव या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांच्यातील समृद्ध अभिनेता आपण अनुभवला. कलाकाराने राजकीय भूमिका घेतली पाहिजे या मताचे ते होते. ही भूमिका त्यांनी सातत्याने घेतली असल्याचे दिसून येते. गिरीश कर्नाड यांच्याकडे कन्नड आणि मराठी या भाषांमधील सेतू म्हणून पाहिले पाहिजे- अतुल पेठे, नाटककार 
..............................
 लेखक आणि माणूस म्हणून गिरीश कर्नाड खूप मोठे होते. त्यांच्या नाटकातून काम करण्याची संधी मला मिळाली आणि या निमित्ताने त्यांचा थोडाबहुत सहवास लाभला हे माझे भाग्यच म्हणावे लागेल. दिल्ली येथे राष्ट्रीय नाट्य विद्यालयामध्ये (नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा) शिकत असताना कार्नाड यांच्या  तुघलक  या नाटकाचे हिंदी आणि उर्दू प्रयोग मी केले होते. अगदी पुराना किला भागातही या नाटकाचे प्रयोग झाले होते. नाटककार म्हणून ही माझी त्यांच्याशी झालेली पहिली ओळख होती. वदन , ययाती , बिखरे बंब  या नाटकांतून त्यांनी माणूसपणाच्या विविध कंगोºयांचा वेध घेतला आहे. काही कारणांनी माझी आणि कर्नाड यांची भेट होत असे तेव्हा त्यांच्यातील विनम्र माणूस मला भावला.- ज्योती सुभाष , ज्येष्ठ अभिनेत्री 
-----------------------------------------------------------
गिरीश कर्नाड यांची दृष्टी अतिशय समृद्ध होती. त्रिकालाबाधित अस्तित्वविषयक तत्वचिंतन आणि समकालीन सामाजिक, राजकीय तानेबाने एकाच वेळी बघू शकणारी एक विलक्षण ताकद त्यांच्या दृष्टीत होती. पुण्यात एका कार्यक्रमात त्यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाचा मी अध्यक्ष होतो. कार्यक्रमापूर्वी आम्ही काही वेळ भेटलो . त्यांना माज्या पुस्तकातला एक विलक्षण विचार आवडला होता. एखादी नवीन कल्पना डोक्यात आली की एखाद्या तरूणाला लाजवेल असा उत्साह  त्यांच्यात संचारायचा. त्या पुस्तकात मी ब्रिटीश अंगाने भारतीय नवरसाची मांडणी करण्याची इच्छा आहे असा विचार मांडला होता. ती मांडणी कशा पद्धतीने करायची असे विचारचक्र त्यांच्या मनात सुरू झाले होते- मकरंद साठे, नाटककार
------------------------------------------------------------


-- 

Web Title: Tribute to Girish Karnad by dignitaries!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.