कारगिल युद्धातील शहिदांना मानवंदना ; दक्षिण मुख्यालयातर्फे कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 08:20 PM2019-07-26T20:20:10+5:302019-07-26T20:23:23+5:30
भारतीय लष्कराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा कारगिल विजयदिन शुक्रवारी नॅशनल वॉर मेमोरियल येथे साजरा करण्यात आला.
पुणे : भारतीय लष्कराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा कारगिल विजयदिन शुक्रवारी नॅशनल वॉर मेमोरियल येथे साजरा करण्यात आला. भारतीय लष्कराने कडाक्याच्या थंडीत यशस्वीपणे पार पाडलेल्या ऑपरेशन विजयचे यानिमित्ताने स्मरण करण्यात आले. १९९९ मध्ये कारगिल युद्धात पाकिस्तानी लष्कराला हरवून भारताने विजय मिळवला होता. या युद्धातील शहिदांना लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना वाहिली.
कारगिल-द्रास सेक्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या चौथ्या युद्धात २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या संपूर्ण मोहिमेला ऑपरेशन विजय नाव देण्यात आले होते. या कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण झाली. भारतीय लष्कराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असणारा कारगिल विजयदिन लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे साजरा करण्यात आला. नॅशनल वॉर मेमोरियल येथे सकाळी लष्करातील वरिष्ठ अधिकारी, निवृत्त सैनिक उपस्थित होते. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी पुष्पचक्र अर्पण करत शहिदांना आदरांजली वाहिली. या वेळी या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेले अनेक माजी अधिकारी तसेच सैनिक उपस्थित होते. त्यांनीही त्यांच्या सहकारी बांधवांना आदरांजली वाहिली. या वेळी नागरिकांनीही या कार्यक्रमात सहभागी होत स्मारकापुढे मेणबत्या पेटवून शहिदांना बलिदान आठवत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
कारगिल विजयावर संरक्षण मंत्रालयातर्फे ऑनलाइन प्रश्नमंजूषा
संरक्षण मंत्रालयातर्फे कारगिल विजयावर ऑनलाइन प्रश्नमंजूषा आयोजित करण्यात आली आहे. २६ जुलै ते ४ ऑगस्ट यादरम्यान, देशातील सर्वांना ही स्पर्धा ऑनलाइन देता येणार आहे. quiz.mygov.in या संकेतस्थळावर याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे. १४ वर्षांपुढील प्रत्येकाला यात सहभागी होता येणार आहे. या प्रश्नमंजूषेत पाच मिनिटांच्या कालावधीत २० प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या सात विजेत्यांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी २५ हजार, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार, तर तिसऱ्या क्रमांकासाठी १० हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तर सात विजेत्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून पाच हजार रुपये देण्यात येणार आहे.