लष्करदिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:15 AM2021-01-16T04:15:27+5:302021-01-16T04:15:27+5:30
पुणे: लष्कराच्या दक्षिण विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी ७३ व्या लष्कर दिनानिमित्त ...
पुणे: लष्कराच्या दक्षिण विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी ७३ व्या लष्कर दिनानिमित्त राष्ट्रीय युद्धस्मारक येथे पुष्पचक्र अर्पण हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी दक्षिण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या लष्कर जनजागृती मोहिमेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
भारतील लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल (नंतर फील्ड मार्शल) के. एम. करिअप्पा, ओबीई यांनी भारतीय सैन्याची धुरा हाती घेतल्याच्या स्मरणार्थ लष्कर दिवस साजरा केला जातो. ‘भारतीय सैन्य मजबूत आणि सक्षम आहे’ ही या वर्षीच्या सैन्य दिनाची संकल्पना आहे.
दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी युद्धात हुतात्मा झालेल्या वीर सैनिकांना पुष्पचक्र अर्पण केले. आर्मी कमांडर यांनी सर्व पदाधिकारी, वीरांगना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शुभेच्छा दिल्या. मातृभूमीचे अंतर्गत आणि बाह्यविरोधकांपासून संरक्षण करण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कोरोना काळातही शत्रूच्या कारवाया रोखण्यासाठी आणि सर्व आव्हाने पेलण्यासाठी लष्कराचा दक्षिण विभाग सदैव कार्यरत होता आणि भविष्यातही राहील, असे मोहंती म्हणाले.
------
जनजागृती मोहिमेचे आयोजन
दक्षिण विभाग मुख्यालयाद्वारे ‘भारतीय लष्कर विविधतेत एकतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित जनजागृती मोहिमेचे आयोजन १९ ऑक्टोबर २०२० ते १० जानेवारी २०२१ दरम्यान केले होते. व्हिडीओ तयार करणे, चित्रकला, घोषवाक्य लेखन आणि छायाचित्रण या प्रकारांत स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील ५२ पारितोषिकांपैकी पुणेकरांनी पाच वैयक्तिक पारितोषिके पटकाविली. मोहंती यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
----
फोटो : स्पर्धेत यशस्वी झालेल्यांना बक्षिस देताना लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती.