'पुलं'च्या मालती माधवमध्ये दिग्गजांचा स्नेहमेळावा, तीन पिढ्यांनी साधला मुक्त संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 11:50 PM2018-06-12T23:50:11+5:302018-06-13T00:02:02+5:30

पुलंच्या मैत्र, आपुलकीने प्रत्येकाच्या मनात घर केले आहे. पुलंनी मराठी माणसाला एवढे काही दिले आहे की 'किती घेशील दो कराने' अशी भावना प्रत्येकाच्या ठायी पहायला मिळते. पुलंच्या ह्याच 'अपूर्वाई'च्या क्षणांना उजाळा देण्यासाठी तीन पिढ्यांमधील दिगगजांचे 'गणगोत' मालती-माधव मध्ये जमले.

tribute to P. L. Deshpande | 'पुलं'च्या मालती माधवमध्ये दिग्गजांचा स्नेहमेळावा, तीन पिढ्यांनी साधला मुक्त संवाद

'पुलं'च्या मालती माधवमध्ये दिग्गजांचा स्नेहमेळावा, तीन पिढ्यांनी साधला मुक्त संवाद

Next

पुणे - पुलंच्या मैत्र, आपुलकीने प्रत्येकाच्या मनात घर केले आहे. पुलंनी मराठी माणसाला एवढे काही दिले आहे की 'किती घेशील दो कराने' अशी भावना प्रत्येकाच्या ठायी पहायला मिळते. पुलंच्या ह्याच 'अपूर्वाई'च्या क्षणांना उजाळा देण्यासाठी तीन पिढ्यांमधील दिगगजांचे 'गणगोत' मालती-माधव मध्ये जमले. 'गुण गाईन आवडी' या भावनेतून सर्वांनीच त्यांच्या मोतीरूप आठवणींची माळ गुंफली.

भांडारकर रोडवरील मालती माधव या इमारतीतील निवासस्थानी पु़ ल व सुनिताबाई असताना साहित्यिक, संगीतकार, चित्रकार, गायक, वादक यांचा गणगोत जमत असत.सध्या हे घर बंद असल्याने अशा मैफिल बंद झाल्या होत्या. पु़ल़ देशपांडे याच्या स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी सर्वांना एकत्र यावे, या हेतून ‘आशय’ च्या वतीने स्रेहमेळाव्याचे आयोजन केले होते.  तीन पिढ्यांच्या प्रतिसादाने मंगळवारी मालती माधव पुन्हा एकदा गजबजून गेलेय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, शि. द. फडणीस, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, माधव वझे, अरुणा ढेरे, प्रा़ मिलिंद जोशी, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, सुधीर गाडगीळ, सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट, गायक राहुल देशपांडे, शौनक अभिषेकी, आनंद भाटे, सावनी शेंडे, प्रकाशक दिलीप माजगावकर, ज्येष्ठ पत्रकार मुंकुंद संगोराम, राम कोल्हटकर, डॉ़ सुधीर लोहकुरे, डॉ़ आशुतोष जावडेकर, शुभदा मोघे, डॉ़ सतीश देसाई, रेखा साने इनामदार, वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार आदि उपस्थित होते. पुलंचे भाचे दिनेश ठाकूर व ज्योती ठाकूर यांनी सर्वांचे स्वागत केले.

पु. ल. देशपांडे यांना अनेकांनी आपल्या कलाकृती भेट दिल्या आहेत. त्यांच्या घरात लावलेली चित्रे  आर्वजून पहात शि. द. फडणीस यांनी त्याविषयीची माहिती सांगितली. पु़ लंचे रवींद्रनाथ टागोर, चॉली चॅप्लीन आणि जॉर्ज बनार्ड शॉ हे दैवत होते. त्यांची छायाचित्रे हॉलमध्ये अजूनही तशीच ठेवण्यात आली आहेत. त्यावर या मान्यवरांनी आपले अनुभव सांगितले. निलकांती पाटेकर यांनी भार्इंना चॉली चॅप्लीनचे कोलाज करुन पाठविले होते. सुनिताबार्इंनी हे सांगितल्याचे सांगून ज्योती ठाकूर म्हणाल्या, एकदा मुंबईत जाऊन निलकांती हिची भेट घेतल्यावर तिने पहिल्यादा ते कोलाज जपून ठेवले आहेत ना असे विचारुन सांगितले की मी दोनच कोलाज केले होते. त्यातील एक भार्इंना दिले आणि दुसरे अमिताभ बच्चन यांना. 

मिरासदार यांच्याशी बोलताना दिनेश ठाकूर यांनी सांगितले की, मला तुमच्या चोरीची कथा आठवली. येथेही दोनदा चोरीचा प्रयत्न झाला होता. त्यावर त्यांनी इथं चोरण्यासारखे काय आहे, अशी मल्लीनाथी केली. प्रा. मिलिंद जोशी यांनी सरकारी कथाकथनाचा द. मां.चा किस्सा सांगितला. सरकारी योजनाच्या प्रसारासाठी कथाकथनाचा कार्यक्रम होता़ त्यात दादांनी (द़ मा़) यांनी माझी चोरी ही कथा ऐकवली. माझे पैसे सरकारी योजनेत गुंतवले असते तर चोरी झाली नसती, असे सांगून सरकारी योजनेची जाहिरात केल्याची आठवण सांगितली.

 द. मा. म्हणाले, भार्इंना मी एकदा म्हणालो होते की, आम्हाला ही सुचते पण जरा उशिरा.

अनिल अवचट यांनी पु.ल. यांना एक ओरीगामी दिले होते. तेही जपून ठेवल्याचे दिनेश ठाकूर यांनी त्यांना दाखविले. त्यावर रामदास फुटाणे यांनी हे अगोदर पुरोगामी होते की ओरीगामी होते, असा प्रश्न केला. त्यावर हसत प्रतिसाद देताना अवचट यांनी मी दोरीचे खेळ करत असल्याने आता लोक मला दोरीगामी म्हणतात असे सांगितले.

निवृत्तीनंतर पुण्यात वास्तव्य

पुलंचे भाचे दिनेश ठाकूर व ज्योती ठाकून हे अमेरिकेत असतात. वर्षातून २ महिने पुण्यात येतात. पु़ ल़ यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यंदा वारंवार पुण्यात येणे होणार आहे. त्यानंतर निवृत्तीनंतर पुढील वर्षी पुण्यात स्थायिक होणार असून, येथेच राहणार आहेत. भाई आणि सुनिताबार्इंचे हे घर त्यावेळी जसे होते तसेच ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे दिनेश ठाकूर यांनी सांगितले.

पुलंविषयी नितांत आदर असलेले दोन मुले आज सकाळीच मालती माधवमध्ये आले होते. त्यांनी अगोदर पाय धूवून येऊ का असे विचारले. पाय धुवून त्यांनी नमस्कार केला. त्यानंतर बोलताना त्यांनी सुनिताबाईंनी लिहिले तसे भाई आळशी होते का अशी निरागसतेने चौकशी केली. तेव्हा ठाकूर यांनी सांगितले की, तालमी असताना ते कधीही आळस करीत नसत. 

पुल़ यांच्या एक झुंज वा-याशी या नाटकातील मुख्य भुमिका मी केली होती. त्याचे उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले होते. ते दाखविण्यासाठी मी पुलंना भेटायला गेलो होतो. त्यावेळी ते मुंबईतील एनसीपीएचे संचालक होते. त्यांनी ते पारितोषिक पाहून दिलेली शाबासकी माझ्यासाठी लाखमोलाची आहे,असे दिलीप प्रभावळकर यांनी सांगितले.

Web Title: tribute to P. L. Deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.