स्वररसराज’द्वारे पं.जसराज यांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:16 AM2020-12-30T04:16:45+5:302020-12-30T04:16:45+5:30

पुणे : आपल्या अलैकिक प्रतिभेतून सकारात्मक आनंद आणि चैतन्याची स्फूर्ती देणारे श्रेष्ठ गायक पं. जसराज यांनी जगाच्या मंचावरून ‘एक्झिट’ ...

Tribute to Pandit Jasraj by Swarrasaraj | स्वररसराज’द्वारे पं.जसराज यांना मानवंदना

स्वररसराज’द्वारे पं.जसराज यांना मानवंदना

Next

पुणे : आपल्या अलैकिक प्रतिभेतून सकारात्मक आनंद आणि चैतन्याची स्फूर्ती देणारे श्रेष्ठ गायक पं. जसराज यांनी जगाच्या मंचावरून ‘एक्झिट’ घेतली असली तरी त्यांचे अजरामर सूर रसिकांच्या हदयात कायमचेच बंदिस्त झाले आहेत. या प्रतिभावंत गायकाला मानवंदना देण्यासाठी औद्योगिक प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी 2021 वर्षाची दिनदर्शिका त्यांना समर्पित केली आहे. या दिनदर्शिकेचे नाव आहे, ‘स्वररसराज’. यात पंडितजींचेच पट्ट शिष्य पं. संजीव अभ्यंकर यांनी आपल्या असामान्यगुरूची वैशिष्ट्ये शब्दबद्ध केली आहेत, हे या दिनदर्शिकेचे वेगळेपण!

दरवर्षी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या व्यासपीठावर भारतीय अभिजात संगीत विश्वातील श्रेष्ठ व्यक्तिमत्वांच्या प्रकाशचित्रांवर आधारित पाकणीकर यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन केले जाते. मात्र कोरोनामुळे यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव होऊ शकलेला नाही. तरीही या उपक्रमात खंड पडता कामा नये या इच्छेतून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक पं. जसराज यांना मानवंदना म्हणून १९८३ ते २०१९ या काळातील काही कृष्ण-धवल प्रकाशचित्रे वापरून या वर्षीची

दिनदर्शिका (थीम कॅलेंडर) त्यांनी निर्मित केली आहे. या कॅलेंडरचे प्रकाशन ३० नोव्हेंबर २०२० रोजी हैद्राबाद येथे संपन्न झालेल्या ‘जय हो’ पं जसराज, पं. मोतीराम पं.मणीराम संगीत महोत्सवात पं.संजीव अभ्यंकर यांच्या हस्ते व दुर्गा जसराज आणि पं. जसराज कुटुंबीयांच्या उपस्थितीत झाले.

या दिनदर्शिकेविषयी ’लोकमत’ शी बोलताना सतीश पाकणीकर म्हणाले, पं. जसराज यांचं गाणं तर मनाला भिडलंच पण सुंदर मुद्रेमुळे त्यांची असंख्य प्रकाशचित्रे घ्यावीशी वाटली. गेल्या 37 वर्षांच्या काळात जवळ जवळ पाचशे गायक-वादकांच्या हजारो भावमुद्रा मला कॅमेराबद्ध करता आल्या. कलेच्या सादरीकरणात हरवून गेलेली कलावंत मंडळी जेव्हा आपल्या सादरीकरणात परमोच्च क्षण गाठतात, तो ‘निर्णायक’ क्षण टिपण्याचा माझा सदैव प्रयत्न राहिला. माझा हा आनंद सर्व संगीतप्रेमींत वाटून घेता यावा यासाठीच ही ’थीम कॅलेंडर’ची निर्मिती करीत आहे.

------------------------

Web Title: Tribute to Pandit Jasraj by Swarrasaraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.