शंकर सारडा श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:00 AM2021-02-05T05:00:11+5:302021-02-05T05:00:11+5:30
शंकर सारडा नव्या लेखकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. नव्या कवींनाही त्यांनी कायम प्रोत्साहन दिले. ते शोधक वृत्तीचे लेखक आणि ...
शंकर सारडा नव्या लेखकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. नव्या कवींनाही त्यांनी कायम प्रोत्साहन दिले. ते शोधक वृत्तीचे लेखक आणि उत्तम समीक्षक होते. त्यांच्या जाण्याने समीक्षा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
- डॉ. नागनाथ कोतापल्ले, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष
-------------
अभिजात समीक्षक
शंकर सारडा हे अभिजात समीक्षक आणि संवेदनशील माणूस होते. त्यांच्या लेखणीचा स्पर्श ग्रामीण पत्रकारितेतील अनेक ग्रंथांच्या गाभ्याला झाला. साताऱ्याचा ग्रंथ महोत्सव ही त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची साहित्यिक आणि सांस्कृतिक सेवा होती. ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो लेखकांच्या पाठीवर हात ठेवून सारडा यांनी त्यांच्या लेखनाची पाठराखण केली. ते माझे अत्यंत जवळचे स्नेही होते.
- डॉ. श्रीपाल सबनीस, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष
-----------------------------
आस्वादक-साक्षेपी समीक्षक
सारडा हे गेल्या पिढीतले अत्यंत उत्तम समीक्षक होते. वृत्तपत्रातील स्तंभलेखनाच्या जागेची मर्यादा सांभाळून त्यांनी आस्वादक समीक्षा फार चांगली केली. मराठीबरोबरच पाश्चिमात्य साहित्याचा परिचयही त्यांनी मराठी वाचकांना करून दिला. लेखकांचे मर्म उलगडून दाखवणे, त्यांच्या साहित्याचा परिचय करून देणारे ते समीक्षक होते. ते अत्यंत उत्साही, स्वागतशील आणि साक्षेपी होते.
- डॉ. रेखा साने-इनामदार, ज्येष्ठ समीक्षिका
-------------------------
मोठे बालसाहित्यिक
शंकर सारडा हे मोठे समीक्षक आणि बालसाहित्यकार होते. मध्यंतरी अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. सारडा यांचा सल्ला नेहमी उपयोगी पडत असे. अनेक कार्यक्रमांत आम्ही एकमेकांना भेटत असू. त्यांच्या सांगण्यावरून मी कविता पाठवल्या, त्यांचे संग्रहही प्रकाशित झाले आहेत. उत्तम समीक्षक म्हणून ते नेहमीच आठवणीत राहतील.
- डॉ. संगीता बर्वे, कवयित्री आणि बालसाहित्यिका
------------------
अनेक विषयांतील सखोल जाणकार
मेहता प्रकाशनातर्फे त्यांचे ‘ग्रंथविशेष’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. आमच्या प्रकाशन संस्थेचे ते मार्गदर्शक आणि आधारस्तंभ होते. त्यांची ‘आऊट ऑफ प्रिंट’ झालेली काही पुस्तके आम्ही नुकतीच प्रकाशित केली. आमच्या ‘ग्रंथजगत’ या हाऊस मॅगझिनचे ते संस्थापक होते. विक्री, सवलत, निर्मितीमूल्य याबाबत त्यांनी कायम मोलाचे मार्गदर्शन केले. जगभर फिरलेले असल्याने त्यांना अनेक विषयांची सखोल जाण होती.
- सुनील मेहता, प्रकाशक
------------------------
बहुआयामी व्यक्तिमत्त्व
दिलीपराज प्रकाशनाचे पहिल्या दिवसापासूनचे हितचिंतक, आमच्या परीक्षक समितीचे प्रमुख, आमचे लेखक आणि ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा यांचे दु:खद निधन झाले, ही अत्यंत क्लेशदायक बातमी आहे. ते माझे अत्यंत जवळचे मित्र, मार्गदर्शक होते. त्यांच्या बरोबरच्या अनेक आठवणी आज मनापुढे रुंजी घालत आहेत. अफाट वाचन, लेखन आणि सतत ग्रंथांच्या सान्निध्यात असणारे सारडा सर्वांना मदत करणारे आणि सर्वांचे मित्र होते. लेखक, पत्रकार, संपादक आणि समीक्षक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेला एक चांगला माणूस आज काळाने हिरावून नेला. ही मराठी साहित्यविश्वाची ही खूप मोठी हानी आहे.
- राजीव बर्वे, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ