मुख्याधिका-यांवर वन्यजीव हत्येचा गुन्हा दाखल करा; 'त्या' वृक्षाला व पक्ष्यांना इंदापूरकरांकडून श्रध्दांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 06:33 PM2023-06-18T18:33:41+5:302023-06-18T18:33:53+5:30
प्राणी पक्षी असो वा माणूस,सर्वांचा जीव एकसारखाच, झाडाबरोबर पक्षी, त्यांची पिल्ले अंडी मारली गेली
इंदापूर: नगरपरिषदेने बेकायदेशीर तोडलेला वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीचा सोबती असणारा चिंचेचा पुरातन वृक्ष व त्या कारवाईत मरण पावलेले असंख्य चित्रबलाक यांना इंदापूरच्या पक्षी व वृक्ष प्रेमी नागरिकांनी अश्रूपूर्ण वातावरणात सामूहिक श्रद्धांजली वाहिली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्यावर वन्यजीव हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी सामूहिकरीत्या करण्यात आली.
गढीच्या पायथ्याशी वृक्षाची कत्तल झाली. त्या ठिकाणी आज (दि.१८) सकाळी अकरा वाजता इंदापूर नागरी संघर्ष समिती, इंदापूर नेचर क्लब, युवा क्रांती प्रतिष्ठान, मराठा सेवा संघ, शिवभक्त परिवार, राष्ट्र सेवा दल, भटक्या विमुक्त जमाती संघटना, शिवदास जनकल्याण ट्रस्ट आदि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व निसर्गप्रेमी नागरिक जमले. चिंचेच्या वृक्षाला कुंकूम तिलक, फुले वाहून पुष्पहार अर्पण करत अश्रूपूर्ण नजरेने त्याला व मृत पक्ष्यांना सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी बोलताना नागरी संघर्ष समितीचे प्रमुख प्रा. कृष्णा ताटे म्हणाले, वीरश्री मालोजीराजे भोसले यांनी लावलेले हे झाड लावले होते. इंदापूरकरांच्या अनेक पिढ्यांची जडणघडण पहाणारे हे झाड तोडताना मुख्याधिका-यांनी गढी उध्वस्त करण्याचा घाट घातला. प्राणी पक्षी असो वा माणूस,सर्वांचा जीव एकसारखाच असतो. झाडाबरोबर पक्षी, त्यांची पिल्ले ही गेली,त्यांची अंडी गेली. हे सारे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्यामुळेच झाले,असे सांगून महाराष्ट्र शासन जागृत असेल तर त्याने रामराजे कापरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून,त्यांना निलंबित करावे,अशी मागणी प्रा.ताटे यांनी केली.
भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस तानाजीराव धोत्रे म्हणाले की, चिंचेचा वृक्ष तोडून तालुक्याची अस्मिता असणारी, वीरश्री मालोजीराजे भोसले यांची पुरातन गढी उध्वस्त करण्याचे कारस्थान मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी केले आहे. शेकडो संरक्षित पक्ष्यांचा अंत केला आहे. मुख्याधिकारी यांच्या नावात राम असला तरी त्यांनी काम मात्र रावणासारखे काम केले आहे. त्यामुळे वन विभाग, तहसिलदार व पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी धोत्रे यांनी केली. तेथून हे सर्वजण इंदापूर पोलीस ठाण्यात गेले. वरील प्रकरणासंदर्भात दिलेल्या तक्रारी अर्जावरील कार्यवाहीबद्दल पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना त्यांनी विचारणा केली. त्यावर पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून त्यांच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस निरीक्षक पवार यांनी दिले.