‘सरल’चा खडतर मार्ग; तांत्रिक अडचणींमुळे शिक्षक बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 03:45 PM2017-10-08T15:45:17+5:302017-10-08T15:53:24+5:30
‘सरल’ प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरताना आधीच आधार सक्ती केल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता भारनिमनाची भर पडली आहे. त्यामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकवर्ग त्रस्त झाला आहे.
पुणे : ‘सरल’ प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरताना आधीच आधार सक्ती केल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता भारनिमनाची भर पडली आहे. त्यामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकवर्ग त्रस्त झाला आहे. एकीकडे माहिती भरण्यात येणार्या अडचणी आणि दुसरीकडे कमी विद्यार्थी संख्या दिसल्यास अतिरिक्त ठरण्याची भीती अशी टांगती तलवार या शिक्षकांवर आहे.
राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची सर्व माहिती ‘सरल’ संगणकप्रणालीच्या माध्यमातील संकलित केली जात आहे. त्याआधारे शिक्षकांची संचमान्यताही केली जाणार आहे. त्यामुळे सध्या सर्व शाळांमधील शिक्षक ही माहिती भरण्यात व्यस्त आहेत. यावर्षी आधार कार्डची माहिती भरण्याचे बंधन घालण्यात आले आहे. सुरूवातीला ही माहिती भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, सातत्याने येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे ही मुदत ५ आॅक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली. पण अडथळे दुर न झाल्याने सर्व शाळांची माहिती भरून झाली नाही. परिणामी पुन्हा एकदा १३ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही ‘सरल’चे संकेतस्थळ सातत्याने हँग होत आहे तसेच इतर अडचणी येत आहेत. त्यातच आता भारनियमनाची भर पडल्याने या मुदतीतही काम पुर्ण होणार नाही, अशी भीती शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.
शिक्षण विभागाने ‘आधार’मधील माहिती ‘सरल’मध्ये भरणे, बंधनकारक केले आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळेतील नोंद वही व आधारवरील माहितीमध्य तफावत आढळून येत आहे. परिणामी माहिती भरण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. काही दिवसांपासून भारनियमन वाढविल्याने त्याचाही फटका बसू लागला आहे. पुणे जिल्हा विनानुदानित शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र गवारी म्हणाले, आधारबरोबरच आता भारनियमनाचा फटका बसु लागला आहे. दिवसभर संकेतस्थळ सातत्याने हँग होते. तर सायंकाळच्या वेळी अनेकदा भारनियमनाला सामोरे जावे लागते. अनेक भागात दिवसाही भारनियमन होते. याचा फटका ग्रामीण भागाला अधिक प्रमाणात बसत आहे. त्यामुळे शिक्षकांना रात्रीच्या वेळीही आता काम करावे लागत आहे. त्यामुळे वाढविलेल्या मुदतीतही विद्यार्थ्यांची माहिती भरून होणार नाही.