पूर्व वैमनस्येतून गुन्हेगाराला जीवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 05:21 PM2018-09-21T17:21:43+5:302018-09-21T17:22:58+5:30
पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून चौघांनी एका गुन्हेगारावर धारधार शस्त्राने वार करून त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केला़.
पुणे : पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून चौघांनी एका गुन्हेगारावर धारधार शस्त्राने वार करून त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केला़. ही घटना गुरुवारी (२० सप्टेंबर) रात्री साडेदहा वाजता गुलटेकडी कॅनलजवळ असलेल्या भारती विलास मित्र मंडळाजवळ घडली़.
भक्तीसिंग दीपकसिंग दुधानी (वय २२, रा़ डायस प्लॉट, गुलटेकडी) असे जखमी झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे़. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी ज्योन्टी ऊर्फ अनिल कांबळे, सागर गायकवाड, बबलु गायकवाड, तानाजी गायकवाड (सर्व रा़ डायसप्लॉट, गुलटेकडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़.याप्रकरणी कन्हैयासिंग पापुलसिंग टाक (वय २०, रा़ डायस प्लॉट, गुलटेकडी) याने स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुधानी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अल्पवयीन असतानाच खुनाचा गुन्हा दाखल झाला होता़. तो दरोडा टाकल्याच्या गुन्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात होता़. नुकताच तो सुटून बाहेर आला होता़. त्याचे वडील व इतर नातेवाईकांवरही अनेक गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे़.
भारती विलास मित्र मंडळाच्या गणपती विसर्जनासाठी टाक हे व त्यांचे मित्र मांडव बांधत होते़. त्यावेळी दुधानी हा महापालिकेच्या बेंचवर बसला होता़. त्याच्या बाजूच्या गल्लीत राहणारे अनिल कांबळे व इतर तिघे रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तेथे आले़. त्यांच्यात व दुधानी यांच्यात पूर्वी भांडणे झाले होती़. या भांडणाचा राग मनात धरून व तो एकटा बसलेला पाहून चौघांनीही त्याच्यावर धारधार शस्त्राने डोक्यात व हातावर सपासप वार केले़. त्यात भक्तीसिंग जखमी होऊन जागीच कोसळला़. त्यानंतर चौघेही पळून गेले़ नागरिकांनी भक्तीसिंग याला रुग्णालयात दाखल केले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत़. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चौघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़. पोलीस उपनिरीक्षक आर. सी. उसगावकर पुढील तपास करीत आहेत़.