दिव्यांग तरुणांची शिवनेरी किल्ल्याची सफर ; दाेन्ही पाय गमावलेला तरुणही सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 09:17 PM2020-01-28T21:17:08+5:302020-01-28T21:18:28+5:30
प्रजासत्ताकदिनी दिव्यांग तरुण- तरुणींनी शिवनेरी किल्ल्याची सफर केली.
पुणे : महाराष्ट्रातील गडकिल्ले पहावेत, त्यांचा इतिहास जाणून घ्यावा अशी इच्छा प्रत्येकाची असते. अशीच इच्छा दिव्यांग तरुणांची देखील असते. परंतु नियतीने केलेल्या अन्यायामुळे अनेकदा त्यांना ही संधी मिळत नाही. या दिव्यांग तरुणांची इच्छा 'मेक माय ड्रिम' फाऊंडेशन आणि एसएनडीटी महाविद्यालयाने पूर्ण केली.
मेक माय ड्रिम आणि एसएनडीटीच्यावतीने प्रजासत्ताकदिनी दिव्यांग तरुणांना शिवनेरी गडाची सफर घडविण्यात आली. यात अनेक तरुण तरुणींनी सहभाग घेतला. दाेन्ही पाय गमावलेल्या आकाश या तरुण देखील यात सहभागी झाला. दिव्यांग मुलांना आत्मविश्वास मिळावा, एक वेगळं जग अनुभवता यावं यासाठी या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. एसएनडीटीच्या पाच अंध विद्यार्थिनी यात सहभागी झाल्या हाेत्या. स्पर्श ज्ञानाने त्यांना संपूर्ण किल्ल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सर्व तरुण हे कुठलिही मदत न घेता किल्ल्यावर वाहनतळापासून चढून आले. एक वेगळा उत्साह या तरुणांच्या चेहऱ्यावर हाेता. या उपक्रमामुळे आत्मविश्वास या तरुणांमध्ये निर्माण झाला.
याविषयी बाेलताना एसएनडीटी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका वासंती जाेशी म्हणाल्या, दिव्यांग तरुणांची गड पाहण्याची जिद्द पाहून आम्हाला खूप आनंद झाला. माेठ्या उत्साहाने हे तरुण या उपक्रमात सहभागी झाले. आम्ही शिवनेरी किल्ल्यावर कधी येऊ शकू अशा पद्धतीने ताे पाहू शकू असे कधी वाटले नव्हते अशा प्रतिक्रीया तरुण तरुणींनी व्यक्त केल्या. संपूर्ण गडाची माहिती त्यांनी घेतली तसेच काेणाचीही मदत न घेता ते पायऱ्या चढून गडावर आले. माझा अनुभव सु्धा अविस्मरणीय हाेता.