थायलंड सहल, जादा परताव्याला भुलून बसला साडेतीन कोटींचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:14 AM2021-09-08T04:14:40+5:302021-09-08T04:14:40+5:30
पुणे : कंपनीतील गुंतवणुकीवर नफ्यातील पाच टक्के रक्कम, जादा परतावा आणि थायलंड सहलीचे आमिष दाखवून १५ जणांना ३ ...
पुणे : कंपनीतील गुंतवणुकीवर नफ्यातील पाच टक्के रक्कम, जादा परतावा आणि थायलंड सहलीचे आमिष दाखवून १५ जणांना ३ कोटी ४६ लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली. ‘एमपीआयडी’ (ठेवीदारांचे हित संरक्षण कायदा) न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा आदेश दिला.
दिनेश भगवानराव कुरकुटे (वय ३५, रा. शिंदेवाडी, ता. आंबेगाव) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह विनायक हरीभाऊ शिरोळे (वय ३८, रा. रावेत), नवनाथ चंद्रकांत मगर (वय ३४, रा. निमगाव, ता. माळशिरस), अमितकुमार मल्हारी पोंदे (वय ३३, रा. भोसरी), नितीन ज्ञानेश्वर कुरकुटे (वय २७, रा. एकलहरे, ता. आंबेगाव), संतोष रंगनाथ भालेराव (वय ३५, रा. कळंब, ता. आंबेगाव) आणि हरिश्चंद्र अशोक वले (वय ३८, रा. चिखली) अशा २१ जणांवर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रचंड दादासाहेब भुसारे (वय ४२, रा. डोणगाव, बीड) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी दिनेश कुरकुटे याच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. कुरकुटे या गुन्ह्यात मुख्य आरोपी असलेली त्याची पत्नी दीपिका कुरकुटे व या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झालेला आरोपी दिनेश गवारे कोठे आहे, याबाबत उडवाउडवीची उत्तरे देत आहे, तसेच त्याने ड्रीमव्हिजन कंपनीच्या नावाखाली डी. के. ट्रेडर्स प्रा. लि., अष्टविनायक इन्फ्रा, प्रॉपकार्ड अशा फर्म स्थापन केल्या आहेत. या कंपन्यांच्या विविध बँक खात्यांवर गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये जमा असून, त्याच्या खर्चाबाबत आरोपी माहिती देत नसून, त्याबाबत तपास करायचा आहे, कुरकुटे याने आपल्या कंपनीत विविध जिल्ह्यांसाठी मुख्य एजंट नेमून, त्यांच्यामार्फत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सेमिनार घेऊन गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे व त्यांची फसवणूक केली आहे, याबाबत तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.