नाकाबंदीतल्या ‘ट्रायपॉड राजा’ची सर्वांना भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:12 AM2021-05-25T04:12:46+5:302021-05-25T04:12:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : संचारबंदीत पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली आहे. बंदोबस्तासाठी विशेष ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : संचारबंदीत पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली आहे. बंदोबस्तासाठी विशेष पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे. बालगंधर्व रंगमंदिराजवळील नाकाबंदीत एक विशेष पोलीस अधिकारी पोलिसांच्या बरोबर बंदोबस्तात सहभागी झाला आहे. त्याचे नाव आहे ‘राजा’.
हा एक तीन पायी कुत्रा असून तो सदैव पोलिसांसोबत दक्ष असतो. म्हणूनच पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नुकतेच ‘राजा नाकाबंदीदरम्यान हजर’ असल्याचे ट्विट केले होते. अभिनेता जॉन अब्राहम यानेही ‘रिट्विट’ करीत ‘ट्रायपॉड राजा’चे कौतुक केले.
हा राजा आला कोठून याची कोणाला माहिती नाही. पोलीस बंदोबस्ताला उभे राहिलेे की राजाही तेथे येऊन उभा राहतो. हळूहळू पोलिसांना त्याचा लळा लागला. ते आपल्या डब्यातील पोळी, बिस्किटे त्याला खायला देऊ लागले. आता राजा पोलिसांबरोबर दिवस-रात्र दक्ष राहतो. येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवतो. डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे म्हणाले की, नाकाबंदीत हा आमचा खास दोस्त बनला आहे. विशेष पोलीस अधिकाऱ्यांपेक्षा तो कोठेही कमी नाही.