विधान परिषदेसाठी पुण्यात तिरंगी लढत
By admin | Published: November 6, 2016 04:41 AM2016-11-06T04:41:08+5:302016-11-06T04:41:08+5:30
विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी माजी आमदार विलास लांडे यांचे मन वळविण्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसला यश आले
पुणे : विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी माजी आमदार विलास लांडे यांचे मन वळविण्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसला यश आले; मात्र तांत्रिकदृष्ट्या त्यांचा अर्ज राहणार आहे. मनसे उमेदवाराचा बाद झालेला अर्ज आणि शिवसेनेची माघार, यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये तिरंगी लढत रंगणार आहे.
विधान परिषदेसाठी दहापैकी पाच उमेदवारांनी माघार घेतल्याने, आता पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार अनिल भोसले, काँगे्रसचे संजय जगताप, भाजपाचे अशोक येनपुरे, राष्ट्रवादी काँगे्रसचे बंडखोर विलास लांडे आणि अपक्ष उमेदवार यशराज पारखी या पाच उमेदवारांचा समावेश आहे; मात्र, लांडे यांनी आपला अर्ज तांत्रिकदृष्ट्या राहिला असून, आपण अनिल भोसले यांचाच प्रचार करणार असल्याचे सांगितले.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शनिवारी अखेरचा दिवस होता. सकाळी दहा ते दुपारी २ वाजेपर्यंत एकही उमेदवार मघारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे फिरकला नाही. दुपारी दोन नंतर आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक केदार (गणेश) गायकवाड माघारी घेण्यासाठी आले. गायकवाड यांच्या माघारीसाठी खासदार संजय काकडे व जगताप जातीने हजर होते. त्यानंतर खेड तालुक्याचे भाजप अध्यक्ष अतुल देशमुख यांनी पुढाकार घेऊन आळंदीचे नगरसेवक बापू थिगळे व चाकणचे नगरसेवक आॅड.प्रकाश गोरे यांचे अर्ज मागे घेतले. तर काँगे्रसचे अधिकृत उमेदवार संजय जगताप, शहरध्यक्ष रमेश बागवे, अभय छाजेड व काँगे्रस पक्षातील काही वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गोपाळ तिवारी यांनी आपला अर्ज मागे घेतला. तिवारी यांच्या माघारी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जगताप यांच्यासह काँगे्रसचे सर्वच नेते पावणे चार वाजे पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये तळ ठोकून होते. शिवसेनेचे ज्ञानेश्वर खंडागळे यांनी देखील तीनला पाच मिनिटी बाकी असताना आपला अर्ज मागे घेतला. भाजपने काही खेळी करत अधिकृत उमेवाराचा अर्ज मागे घेतला असता तर शिवसेना आपला अर्ज कायम ठेवणार होती, असे खंडागळे यांनी स्पष्ट केले.
लांडे यांचे माघारीनाट्य...
विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रसचे बंडखोर उमेदवार विलास लांडे आपला अर्ज मागे घेणार किंवा नाही, याकडे लक्ष लागले होते.
माघारीची मुदत संपण्यापूर्वी काही मिनीट अगोदर लांडे यांचा प्रतिनिधी माघारीचे पत्र घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल झाला; परंतु लांडे यांनी आपला अर्ज मागे घेण्यासाठी संबंधित व्यक्तींची अधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करीत असल्याचे लेखी पत्र देणे आवश्यक होते.
संबंधित प्रतिनिधीने हे पत्र न दिल्याने, त्याचा अर्ज घेण्यात आला नाही. यामुळे अखेर निवडणुकीच्या रिंगणात पाच उमेदवार शिल्लक राहिले.