'त्रिशलानंदन वीर की... जय बोले महावीर की...' पुण्यात भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी
By अजित घस्ते | Published: April 21, 2024 03:50 PM2024-04-21T15:50:44+5:302024-04-21T15:51:01+5:30
शोभायात्रेत मतदान जागृती, पाणी वाचवा, शहरातील स्वच्छता अशा विविध सामाजिक संदेशाचे फलक होते
पुणे: ढोल तासाच्या गजरात ,आकर्षक पारंपारिक वेशभूषा, वैशिष्ट्यपूर्ण देखावे, लेझीमसह विविध वाद्य पथके आणि 'त्रिशलानंदन वीर की... जय बोले महावीर की...' अशा जय घोषात रविवारी शहराच्या मध्यवर्ती भागातून भगवान महावीर यांचा रथ व भव्य शोभायात्रेव्दारे भगवान महावीरांची जयंती मोठया उत्साहात जैन बांधवांतर्फे साजरी करण्यात आली.
श्री जैन सामुदायिक उत्सव समितीतर्फे जैन समाजाचे चारही संप्रदाय श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा, श्री दिगंबर जैन समाजाच्या संयुक्त विद्यमाने श्री तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
यावेळी श्री जैन सामुदायिक उत्सव समितीचे अध्यक्ष अचल जैन, उपाध्यक्ष भरतभाई शहा, विजयकांत कोठारी, सचिव अनिल गेलडा, संपत जैन, कोषाध्यक्ष समीर जैन, प्रचार प्रमुख सतीश शहा, महावीर कटारीया, गणपत मेहता, बाळासाहेब धोका, नितीन जैन, राजीव शहा यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. मतदान जागृती,पाणी वाचवा, शहरातील स्वच्छता अशा विविध सामाजिक संदेशाचे फलक हातात घेऊन शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रविवारी सकाळी ७ वाजता श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर, फुलवाला चौक येथून या शोभा यात्रेला सुरूवात करून बोहरी आळी, लक्ष्मी रोड, सोन्या मारुती चौक, ही शोभायात्रा श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर, भांडी बाजार, लालबहादूर शास्त्री चौक, बोहरी आळी, सोन्या मारुती चौक, गणेश पेठ, गोविंद हलवाई चौक, बुरडी पूल, पालखी विठोबा चौक, श्री शंस्वेश्वर पार्श्वनाथ मंदिर, रामोशी गेट, टिंबर मार्केट मार्गावरून मनमोहन पार्श्वनाथ मंदिर, सेव्हन लव्हज् चौक पासून कटारीया हायस्कूल, लक्ष्मी विलास, मुकुंदनगर, सुजय गार्डन, शिवशंकर कार्यालय ते सातारा रोड येथील आदिनाथ स्थानक येथे या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.