ट्रोलिंग, अश्लील शेरेबाजी आणि धमक्या : महिलांवरचे ‘व्हर्च्युअल’ चारित्र्यहनन रोखणार कोण ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 02:31 AM2019-03-22T02:31:55+5:302019-03-22T02:31:59+5:30
समाजात महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकार वाढत असताना समाजमाध्यमांवरही त्यांचे शोषण होत आहे. अत्यंत हीन पातळीवर ट्रोल करीत त्यांचे चारित्र्यहनन करण्याचे प्रकार वाढले आहेत.
- नम्रता फडणीस
पुणे - समाजात महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकार वाढत असताना समाजमाध्यमांवरही त्यांचे शोषण होत आहे. अत्यंत हीन पातळीवर ट्रोल करीत त्यांचे चारित्र्यहनन करण्याचे प्रकार वाढले आहेत. महिलांनी विरोधात मत व्यक्त केले तर वैयक्तिक किंवा सामूहिक झुंडी ट्रोलिंगद्वारे त्यांच्यावर शाब्दिक अत्याचार करीत आहेत. महिलांचे अश्लील शेरेबाजी, अपमानजनक वक्तव्य, बलात्काराच्या धमक्यांमधून सामाजिक आणि मानसिक अध:पतन केलं जात आहे. हे प्रकार रोखणार कोण? आणि कसे? असा प्रश्न नेटिझन्स महिलांकडून उपस्थित केला जात आहे.
एखाद्या विषयावर मतप्रदर्शन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. चर्चा घडणं, संवाद होणं हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. मात्र सोशल मीडियावर महिलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचीच मोठ्या प्रमाणावर गळचेपी केली जात आहे. एखाद्या विशिष्ट विषयावरची तिची मते किंवा विरोध अनेकांना मान्यच होत नाही.
अगदी अभिनेत्री स्वरा भास्कर, अलिया भट असोत किंवा केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी असोत यांच्यासह अनेक जणी या ‘ट्रोल’च्या बळी ठरल्या आहेत. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी केलेल्या ट्विटचाही विपर्यास करून त्यांना अत्यंत हीन भाषेत ट्रोल केले जात आहे. दोनच दिवसांपूर्वी पत्रकार बरखा दत्त यांनाही वाईट पद्धतीने ट्रोल केलेल्या काही जणांना नुकतीच अटक करण्यात आली आहे.
ही केवळ प्रातिनिधिक उदाहरणे असली तरी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या अनेक महिलांना या ट्रोलिंगला दिवसागणिक सामोरे जावे लागत आहे. त्यातील अनेकजणी तक्रार न करता दुर्लक्ष करतात, तर काहींना मानसिक ताणतणावांना सामोरे जावे लागते. एखाद्याचे मत मान्य नसेल तर त्याला संयतपणे नक्कीच उत्तर देता येऊ शकते, मात्र तसे न घडता विरोधक हा महिलेवर अत्यंत खालच्या स्तरावर वैयक्तिक टीका-टिप्पणी करण्यास सुरुवात करतो, जे अत्यंत घातक असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. याविषयी ’लोकमत’ने सोशल मीडियातज्ज्ञ मुक्ता चैतन्य यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या आभासी जगतावर प्रकाश टाकला.
महिलांवर खालच्या पातळीवर शब्दांचा मार...
मुक्ता चैतन्य म्हणाल्या, एखादं मत कुणी मांडलं किंवा एखाद्या राजकीय विचारांपेक्षा वेगळी भूमिका मांडली तर महिलेला खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करणं, धमक्या देणं हे प्रकार अनेक वर्षांपासून होत आहेत. एखाद्याचं मत पटलं नसेल तर प्रतिक्रिया देताना असभ्य भाषेत देण्याची गरज नसते. मात्र ही पातळी सोशल मीडियावर ओलांडली जाते. त्यातून बलात्काराच्या धमक्या देणं, पुरुषांनाही तुमच्या बायकांना काहीतरी करू, अस धमकावलं जाण्याचे प्रकार घडतात. मात्र यात एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते; पण ती सिद्ध करणं अवघड आहे.
सोशल मीडियावरील ‘ट्रोल’ हे दोन प्रकारचे असतात. काही ट्रोल हे ‘पेड’ असतात. जे करण्यासाठी पैसे घेतले जातात आणि दुसऱ्या पद्धतीचा ‘ट्रोल’ हा जरी पेड नसला तरी ज्या पद्धतीची भाषा सातत्याने वापरली जाते, त्यातून सोशल मीडियावर बोलण्याची हीच भाषा असते, असे गृहीत धरूनच ट्रोल केले जाते. हा जो समुदाय आहे तो अधिक गंभीर आहे.
दुसरा गट सोशल मीडियावर झपाट्याने वाढतो आहे. दुर्दैवाने एकही विचारधारा यातून सुटलेली नाही. डावे, उजवे कुणीही उरलेले नाही. आपल्या विरोधात कुणी बोललं तर त्याचा शाब्दिक बलात्कार करायचा. निवडणुकीचा जो ज्वर चढला आहे, त्याबाबत विचारप्रबोधन करण्याशिवाय पर्याय उरलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर एखादं मत व्यक्त केलं आणि ते पटलं नाही तर वैयक्तिक स्तरावर खालच्या पातळीवर ट्रोलिंग केलं
जातं. याचा अनेकदा अनुभव घेतला आहे. खूप त्रासही झाला आहे. या प्रकारचे ‘व्हर्च्युल’ बलात्कार होणं ही खूप गंभीर बाब आहे. मात्र दुर्लक्ष करण्याशिवाय पर्याय नाही.
- वैशाली जाधव, आरोग्य अधिकारी, महापालिका
सोशल मीडिया हाताळताना काय काळजी घ्यावी ?
- प्रत्येकाने स्वत:ची रेड लाईन (मर्यादा) आखून घ्यायला हवी. जर एखाद्याने मर्यादा ओलांडली तर त्याला त्याची जाणीव करून द्यावी. त्या व्यक्तीला ब्लॉक करण्याचा पर्यायही निवडावा.
- महिलांना अनेकदा समोरच्या व्यक्तीला हे आवडलं नाही हे सांगण्याचं धारिष्ट्य नसतं. ते म्हणता न आल्यानं सगळं चालतं अस वाटत राहतं.
- एखाद्या वेळी खूप जास्त ट्रोलिंग झालं तर सायबर क्राइम सेलची मदत घेणं आवश्यक आहे. त्यात क मीपणा, बदनामी होईल असे मानू नये.
- समोरच्याचे अकाऊंट फेक आहे असं वाटलं किंवा ती व्यक्ती पटत नसेल तर त्याला तातडीने ब्लॉक करावं.
- फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना काळजी घेतली पाहिजे. त्याच्या प्रोफाईलला जाऊन पाच ते सात दिवसांच्या पोस्टचा अंदाज घ्यावा. कोणते फोटो शेअर करतो हे जाणून घ्यावे.
- वैयक्तिक छायाचित्रे प्रोफाईलमध्येच टाकावीत, कारण त्याला गार्ड असते. साध्या वॉलवर टाकले तर कुणीही डाऊनलोड करण्याची भीती असते.
- फोन लॅपटॉपमधून डिलीट केले तरी आपल्या सेव्हरमधून ते डिलीट होत नाही. फुटप्रिंट काढू शकत नाही. चार वेळेला विचार करून पोस्ट टाका, ते कायमस्वरूपी सेव्हरवर राहाते.
- फेसबुकने फिल्टर्स दिले आहेत, त्याचा वापर करायला हवा.
- आपली टाइमलाइन ही आपली पर्सनॅलिटी असते, ती जपणे आपले कर्तव्य आहे.