पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरजवळ भीषण अपघात; फळ विक्रेत्याच्या अंगावर पडला ट्रक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 08:37 PM2021-11-26T20:37:24+5:302021-11-26T20:47:03+5:30
लहान मुले गंभीर जखमी असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचेवर प्राथमिक उपचार करीत अकलुजला पुढील उपचारासाठी पाठविले आहे...
बाभुळगाव(पुणे): इंदापूर नगरपरिषद हद्दीतील बाह्यवळण मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक गतिरोधकावर आदळल्याने पाटे तुटले. यामध्ये चालकाचा गाडीवरील ताबा सुटून ट्रक रस्त्याच्या कडेला फळ विक्रेत्याच्या अंगावर गेल्याने अपघात झाला. या अपघातात फळ विक्रेत्या महिलेसह दोन लहान मुले गंभीर जखमी झाले आहेत. ट्रक भिमाई आश्रम शाळेनजिक शिंदे वस्ती चौक येथे गतीरोधकावर आदळला. शुक्रवारी सायंकाळी ५:१५ च्या सुमारास अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिंवडीवरून तुळजापूर येथे देव दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची बस इंदापूर बाह्यवळन महामार्गालगत चहापानासाठी थांबली होती. बसमधील दोन लहानमुले ही शेजारी विक्रेत्याकडून पेरू विकत घेत होते. याचवेळी गतीरोधकावर आदळून पाटे तुटून अपघात झाला. यामध्ये ही मुले गंभीर जखमी झाली.
अपघाताची माहिती मिळताच इंदापूर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी अपघातग्रस्तांना खासगी वाहनातून आणत उपचारासाठी उपजिल्हा रूग्णांलयात दाखल केले. लहान मुले गंभीर जखमी असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचेवर प्राथमिक उपचार करीत अकलुजला पुढील उपचारासाठी पाठविले आहे. अधिक तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.
उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा
अपघातात गंभीर जखमी झालेल्या लहान मुलांना उपजिल्हा रूग्णांलयात दाखल करण्यात आले. यावेळी कामावर असणारे डॉ. नामदेव गार्डे हे जखमी रूग्णांजवळ आले. त्यांनी रूग्णांची पाहणी करत असताना त्यांना फोन आला. त्यानंतर डॉ. गार्डे हे लगेच तेथून निघून गेले. त्यानंतर अर्ध्या तासाने ते परत दवाखान्यात आले. त्यानंतरच जखमींवर उपचार केले.
डॉ.गार्डे यांचा खासगी दवाखाना उपजिल्हा रूग्णालयासमोर आहे. ते सरकारी दवाखान्यात सेवा बजावताना त्यांचा स्वत:चा खासगी दवाखानाही चालवतात. त्यांचे स्वत:च्या दवाखान्यात अधिक लक्ष असल्याचे दिसून आले. परिणामी उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत.