चोरीच्या दुचाकी नेणारा ट्रक पकडला
By admin | Published: April 4, 2015 06:04 AM2015-04-04T06:04:11+5:302015-04-04T06:04:11+5:30
शहराच्या विविध भागांमधून दुचाकींची चोरी करून या दुचाकींची कर्नाटकात विक्री करणाऱ्या टोळीचा चतु:शृंंगी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
पुणे : शहराच्या विविध भागांमधून दुचाकींची चोरी करून या दुचाकींची कर्नाटकात विक्री करणाऱ्या टोळीचा चतु:शृंंगी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका ट्रकमध्ये भरून कर्नाटककडे नेल्या जात असलेल्या दहा दुचाकी ट्रकसह पोलिसांनी पकडल्या आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
सुधीर बसण्णा सुतके (वय २३, रा. काळाखडक, वाकड), महानतेश बसंतराम गतरगी (वय २४, रा. इंगळगी, गुलबर्गा, कर्नाटक) अशी अटक आरोपींची नावे आहेत. चोरीच्या दुचाकी घेऊन एक ट्रक बाणेर रस्त्यावरील महाबळेश्वर चौकामधून कर्नाटककडे जाणार असल्याची माहिती तपास पथकाचे उपनिरीक्षक राजाराम चौहान यांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त डी. जी. वाळुंजकर, पोलीस निरीक्षक सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर रस्त्यावर सापळा लावण्यात आला. एका ट्रकवर संशय आल्याने पोलिसांनी त्याला थांबवले. पोलिसांनी ट्रकमधील सामानाबाबत माहिती विचारली असता आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यामुळे पोलिसांनी ट्रकची झडती घेतली. ट्रकमध्ये सिमेंटची रिकामी पोती भरलेली होती. या पोत्यांच्या खाली दहा मोटरसायकली आढळून आल्या. सुधीर सुतके याच्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत. त्याला यापूर्वी अटकही झाली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. ही कारवाई उपनिरीक्षक राजाराम चौहाण, तुषार पाचपुते, पोलीस कर्मचारी बाळू गायकवाड, संजय शिंदे, शरद पाटील, संजय वाघ, चेतन गोरे, प्रवीण पाटील, विजय मोरे, जाधव, दिलीप गोरे यांनी केली.