पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकची चारचाकी, दुचाकीला धडक; एकाचा मूत्यू, ३ जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 06:25 PM2022-08-21T18:25:37+5:302022-08-21T18:26:11+5:30
मालवाहतुक ट्रक इंदुर येथून शिक्रापुर - सणसवाडी येथे गव्हाचा आटा चालला होता
राजगुरुनगर : पुणे -नाशिक महामार्गावर खेड घाटात भरधाव मालवाहतुक ट्रकने दोन वाहनांना धडक दिली. या धडकेत एकाचा जागीच मुत्यू झाला. अशोक दगडू विश्वास (वय ६१ रा. निरगुडसर ता आंबेगाव ) असे मृत्यू झाल्याचे नांव असून तीन जण गंभीर जखमी झाले आहे. या घटनेनंतर मालवाहतुक ट्रकही रस्त्यावर पलटी झाला. हि घटना दि २२ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत खेडपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवाहतुक ट्रक इंदुर येथून शिक्रापुर - सणसवाडी येथे गव्हाचा आटा चालला होता. पुणे -नाशिक महामार्गावरील नवीन खेड बाह्यवळण घाटात मालवाहतुक ट्रक चालकाचा ताबा सुटून एका पिकअप चारचाकी वाहनाला पाठीमागुन जोराची धडक दिली. या धडकेत पिकअप गाडीचा चेंदामेंदा होऊन विश्वास तुकाराम टिंगरे, रूपाली विश्वास टिंगरे (रा. खानवस्ती मंचर ता आंबेगाव ) व एक महिला गंभीर जखमी झाले. दरम्यान निरगुडसर येथील अशोक दगडू विश्वास हे खेड कडे दुचाकीवर जात असताना मालवाहतुक ट्रकची धडक बसल्याने अशोक विश्वास यांचा जागीच मुत्यू झाला. दोन्ही अपघात घडल्यानंतर मालवाहतुक ट्रक अर्धा किलोमीटर अंतरावर जाऊन रस्त्यावरच पलटी झाला. ट्रकमधील गव्हाचा आट्याचे बाक्स रस्त्यावर आले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. ट्रक चालक राजू नामदेव दुधवडे (रा. वडगाव आंनद आळेफाटा ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार संतोष घोलप करित आहे.