Accident: नदीपात्रात कोसळणारा ट्रक चक्क अर्ध्यावर लटकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 18:04 IST2021-10-07T17:57:23+5:302021-10-07T18:04:10+5:30
चालकाने प्रसंगावधान दाखवत लगेच उडी घेतल्याने तो बचावला

Accident: नदीपात्रात कोसळणारा ट्रक चक्क अर्ध्यावर लटकला
राजगुरुनगर : पुणे - नाशिक महामार्गावर भिमानदी पुलाचे संरक्षक कठडे तोडत ट्रक चक्क अर्ध्यावर लटकला. सुदैवाने ट्रक नदीपात्रात कोसळला नसल्याने मोठा अनर्थ टळला. तसेच जीवीतहानी टळली. हि घटना ७ तारखेला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
पुणे - नाशिक महामार्गावर भिमा नदी पुल अरूंद आहे. मालवाहतूक ट्रक नाशिककडून पुण्याकडे जात होता. पहाटे धुके व त्यातच चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट पुलाच्या लोखंडी संरक्षक कठड्याला धडक देत कठड्यावरती गेला. ट्रक पुलावर अधांतरी अडकला होता. चालक मुतजा शेख रा. कोलकत्ता यांने प्रसंगावधान दाखवत लगेच उडी घेतल्याने तो बचावला सुदैवाने ट्रक कठड्यावर अडकला.
घटनास्थळी पोलिस हवालदार संतोष शिंदे, संदिप भापकर, संजय पावडे, भाऊ कोरके, बबन भवारी यांनी धाव घेतली. क्रेनच्या सह्याने अपघातग्रस्त ट्रक बाजूला केला. पहाटे घडलेल्या घटनेमुळे भिमा नदी पुलाच्या दोन्ही बाजुला वाहनाच्या जवळपास दोन किलोमीटरपर्यत रांगा लागल्या होत्या. या मुळे वाहतुक ठप्प झाली होती. अपघातग्रस्त ट्रकला बाजूला केल्यानंतर पोलिसांनी पुणेकडे जाणारी वाहतुक सोडली. काही वेळानंतर वाहतुक पुर्णत: सुरळीत केली.