भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात ट्रक अडकला;सकाळपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 08:11 PM2020-09-09T20:11:10+5:302020-09-09T20:12:49+5:30

घाटातील दुचाकी वाहनांसह सर्वच गाड्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या..

The truck got stuck in Warandha Ghat on Bhor-Mahad road; Traffic jam | भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात ट्रक अडकला;सकाळपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प

भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात ट्रक अडकला;सकाळपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देवरंधा घाटातील पडलेली संरक्षक भितीचे काम लवकर करण्याची मागणी 

भोर - कोकणात जाणारा जवळचा मार्ग असल्याने भोर- महाड मार्गावरील वरंधा घाट मार्गे प्रवास करण्याकडे प्रवास नागरिक आणि वाहन चालकांचा अधिक कल असतो. मात्र, महाडच्या दिशेला दरड पडल्यामुळे वरंधा घाटातून फक्त लहान गाड्यांची वाहतुक सुरु आहे. मोठया आणि अवजड वाहनांना वाहतुक करण्यास परवानगी नाही.परंतु, काही चालक या नियमांकडे दुर्लक्ष करून सर्रास या मार्गे वाहतूक करतात. अशाचप्रकारे एक ट्रक बुधवारी सकाळपासून घाटात अडकून पडला.त्यामुळे घाटातील दुचाकी वाहनांसह सर्वच गाड्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
     भोर- महाड रस्त्यावरील वरंधा घाटाच्या महाडच्या हद्दीत रस्त्याची जुनी संरक्षक भिंत मागच्या महिन्यात कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावर सायंकाळी ५ ते सकाळी ८ या वेळेत सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली असून,फक्त सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत दुचाकी व चारचाकी लहान गाड्या काही प्रमाणात जात आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत घाटातील रस्ता बंद असल्याचे फलक अनेक ठिकाणी लावले आहेत. तसेच परिसरातील नागरिकही मोठ्या अवजड वाहनांच्या चालकांना घाट बंद असल्याबाबत सांगत आहेत.मात्र तरीही चालक त्याकडे दुर्लक्ष करून हेकेखोरपणे घाटातूनच प्रवास करतात. त्यामुळे अनेकदा अवजड वाहने घाटात अडकुन बसण्याच्या घटना घडतात.


      
बुधवारी सकाळी एक १४ चाकांचा मोठा ट्रक भोरवरुन वरंधा घाटातून महाडला निघाला होता.हा ट्रक घाटाच्या भोर बाजूकडील रस्ता पार करून झाल्यावर महाडच्या बाजूला संरक्षक भिंत कोसळलेल्या भागात रस्त्यावर अडकून पडला.वळणाचा आणि खचलेला रस्ता असल्यामुळे ट्रक चालकास ट्रक पुढेमागे हलविता आला नाही.त्यामुळे सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली आणि वाहनांच्या रांगा लागल्या. ट्रकला हलविण्यासाठी महाडच्या बाजूने जेसीबी आणण्यात आला आहे.मात्र,अपघाती जागा असल्यामुळे त्यालाही अनेक अडचणी निर्माण होत आहेत.सायंकाळी उशिरापर्यंत ट्रक काढण्याचे काम सुरू होते.महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटातील महाड बाजूकडील मार्ग लोखंडी पाइप टाकून बंद केला असल्याचे महाड पोलिसांकडून सांगण्यात आले.
       
 वरंधा घाटातील पडलेली संरक्षक भितीचे काम लवकर करण्याची मागणी 
कोकणात जाणारा जवळचा मार्ग असल्याने याचा आधिक वापर केला जातो. शिवाय भाजीपाला, माल वाहतुक करणाऱ्या गाड्यांसह पर्यटकही याच मार्गाचा वापर जास्तीत जास्त वापर करतात. त्यामुळे महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरची संरक्षक भिंत लवकर दूरुस्त करण्याची मागणी प्रवासी नागरिक करत आहेत.

Web Title: The truck got stuck in Warandha Ghat on Bhor-Mahad road; Traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.