पालखी मार्गावरून ट्रक थेट नदीतील मारुती मंदिराला धडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:08 AM2021-06-29T04:08:21+5:302021-06-29T04:08:21+5:30
पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील अपघातांची मालिका काहीही केल्या संपेना. सोमवारी भल्या पहाटे एक भरधाव ट्रक पुणे बाजूने येताना सरळ ...
पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील अपघातांची मालिका काहीही केल्या संपेना. सोमवारी भल्या पहाटे एक भरधाव ट्रक पुणे बाजूने येताना सरळ नीरा नदीच्या जुन्या पुलाकडे गेला व नदीकाठी असलेल्या मारुती मंदिराच्या पायऱ्या व संरक्षण भिंतीवर जोरदारपणे धडकला. नीरा नदीतील मारुती मंदिराचे कठडे पाडले. मंदिराच्या संरक्षण भिंतीचे प्रचंड नुकसान केले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे पुणे येथून कोल्हापूरच्या दिशेने चाललेला ट्रक (एम.एच.०९- सी.ए -१६१२) नीरा पालखीमार्गावर नीरा नदीच्या पुलाजवळ लावलेल्या पोलिसांच्या बँरिकेटला जोरात धडकला, त्यानंतर तो थेट पालखी तळाशेजारील जुन्या ब्रिटिशकालीन पुलाच्या दिशेने भरधाव निघाला. बॅरिकेडच्या व ट्रकच्या धडकेच्या आवाजाने लक्ष्मीमंदिरात बंदोबस्तावर असलेले होमगार्ड व मारुती मंदिरात झोपलेला एक व्यक्ती जागी झाली. तर ट्रक मारुती मंदिराच्या पायरीला व संरक्षण भिंतीला जोरात धडकला. धडक इतकी जोरात होती की मारुती मंदिराच्या संरक्षण भिंतीचे प्रचंड नुकसान झाले. चालक मद्यधुंद असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
ट्रकचालक सायास नगरगोजे (वय ३९, रा. लातूर, सध्या राहणार पुणे) याला कोणत्याही प्रकारच्या किरकोळही जखमा झाल्या नाहीत. नीरा पोलीस दूरक्षेत्राचे राजेंद्र भपाकर, सुरेश गायकवाड, होमगार्ड किरण शिंदे, मोहन साळुंखे, स्वप्नील भेस्के, प्रसाद तारू हे बंदोबस्तावर असल्याने ट्रकचालकाला तातडीची मदत मिळाली. अपघातानंतर बारामती अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी पहाटे गस्तीच्या वेळी अपघातस्थळी भेट दिली.