पुण्यातून देवदर्शनासाठी अक्कलकोटला जाणार्या कारला ट्रकची धडक; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 02:49 PM2024-08-23T14:49:04+5:302024-08-23T14:49:27+5:30
देवदर्शनासाठी जाताना कार गरम झाल्याने महामार्गाच्या बाजूला उभी करून थांबले होते
यवत : पुणे येथून देवदर्शनासाठी अक्कलकोटला जाणार्या मित्रांची कार गरम झाल्याने महामार्गाच्या बाजूला उभी करून थांबले होते. पाठीमागून आलेल्या हायवा ट्रकने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले.
हा अपघात काल (दि.२१) सकाळी साडेअकरा ते पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान पुणे सोलापूर महामार्गावर वाखारी गावच्या हद्दीत सिंधुमाई हॉटेल जवळ , सीएनजी पेट्रोल पंपा समोर घडला.याबाबतची फिर्याद अजित बोराटे (रा गंजपेठ , पुणे) यांनी यवत पोलिसात दिली आहे. अपघातातकार मधून प्रवास करणारे रोहीत प्रकाश पोकळे ( वय - ३०, रा.नवले ब्रिज जवळ , धायरी, पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला.तर सूरज मधुकर पेटाडे (वय - ३१ , रा.गंजपेठ , पुणे) ,विजय श्रीनिवास क्षीरसागर ( वय - ३३ , रा.कात्रज, पुणे) व अजित बोराटे हे जखमी झाले.
याबाबत यवत पोलीस सुत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार यातील फिर्यादी, हे तरुण त्यांच्या स्विफ्ट कार मधून अक्कलकोट येथे देवदर्शनाला जात होते. त्यांची कार वाखारी गावच्या हद्दीत पेट्रोल पंपा समोर आली असता गरम झाली होती. रोडच्या कडेला लावून बोनेट उघडून कार समोर उभे होते. त्यावेळी पुण्याकडून सोलापूर बाजूकडे जाणाऱ्या हायवा ट्रकने पाठीमागून कारला धडक दिली. आणि समोर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून धडकला. पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उत्तम कांबळे करीत आहेत.