बैलगाडीला टँकरची धडक ; आईसह चिमुकलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 09:05 PM2018-11-10T21:05:22+5:302018-11-10T21:07:23+5:30
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीला टँकरने जोरदार धडक दिली. या अपघातात बैलगाडीतील आई व तिच्या लहान बाळाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले.
वरवंड : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीला टँकरने जोरदार धडक दिली. या अपघातात बैलगाडीतील आई व तिच्या लहान बाळाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले. ही घटना शनिवारी पहाटे घडली. जयश्री गोरख चव्हाण (वय ३०) आणि दिव्या गोरख चव्हाण (वय ३ महिने) असे मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरवंड-चौफुला शिवेवर ऊ सवाहतूक करणारी बैलगाडी ऊसतोडणी करण्यासाठी जात होती. या वेळी विरुद्ध बाजूने भरधाव टँकर आला. टँकरने या बैलगाडीला जोरदार धडक दिली. यामुळे बैलगाडीमधील जयश्री चव्हाण आणि तिची ३ महिन्यांची चिमुकली दिव्या चव्हाण या दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर गोरख चव्हाण व वेडू चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी ५च्या सुमारास झाला. मात्र पोलीस घटनास्थळी उशिरा दाखल झाल्याने पोलिसांबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. अपघाताच्या ठिकाणापासून वाहतूक पोलीस १ कि.मी. अंतरावर असूनही ते उशिरा दाखल झाले. टँकरचालक संजयकुमार उदीतकुमार मंडल याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.