संभाजी ब्रिगेडने फुंकले निवडणुकीचे रणशिंग, सर्व पक्षांविरोधात उभे राहण्याचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 07:38 PM2017-12-03T19:38:01+5:302017-12-03T19:38:18+5:30
पुणे : प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात उभे राहून जनतेला चांगला पर्याय देण्याचा निर्धार करीत संभाजी ब्रिगेडने कार्यकर्ता महामेळाव्यात राज्यात 2019मध्ये होणा-या निवडणुकांचे रणशिंग फुंकले.
पुणे : प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात उभे राहून जनतेला चांगला पर्याय देण्याचा निर्धार करीत संभाजी ब्रिगेडने कार्यकर्ता महामेळाव्यात राज्यात 2019मध्ये होणा-या निवडणुकांचे रणशिंग फुंकले. सर्वच पक्षांवर जोरदार टीका करीत राजकीय दहशतवादाचे उच्चाटन करण्याचे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांना करण्यात आले.
संभाजी ब्रिगेडच्या राजकारणातील पहिल्या वर्धापनदिनामित्त पुण्यात गणेश कला क्रीडा मंच येथे रविवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते. ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. महासचिव सौरभ खेडेकर, प्रदेश संघटक अमोल मिटकरी, प्रवक्ते गंगाधर बनबरे, डॉ. शिवानंद भाणुसे, मराठा सेवा संघाचे मधुकर मेहकरे, जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ राज्य शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला एका शेतक-याच्या हाताने फाशी देऊन मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. भांडारकर संस्था प्रकरणातून निर्दोष सुटलेल्या कार्यकर्त्यांसह अॅड. मिलिंद पवार व समीर घाडगे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. इम्तियाज पिरजादे यांनी यावेळी ब्रिगेडमध्ये प्रवेश केला. आखरे म्हणाले, सध्या सर्व राजकीय पक्षांतील नेत्यांचे आपआपसांत लागेबांधे आहे.
राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायला हवेत. आज नेतृत्वाचा दुष्काळ असून ही पोकळी भरून काढण्याचे काम करावे लागणार आहे. प्रस्थापित राजकारण्यांच्याविरुद्ध आगामी निवडणुकांमध्ये उभे राहण्यासाठी सज्ज राहा. नोटाबंदी करून पंतप्रधानांनी नागरिकांची आर्थिक कोंडी केली आहे. जीएसटीचा निर्णयही चुकला आहे. ब्रिगेडने खुप आंदोलने केली असून आता अंबानींच्या घरासमोर आंदोलन करून दगड मारल्याशिवाय समाधान मिळणार नाही, असे खेडेकर यांनी नमुद केले. बनबरे, मेहकरे यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली.
-----------------------------
आशिष फडणवीस करतात डील
अमृता फडणवीस या भाजपा सरकारच्या पहिल्या लाभार्थी आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत. त्यांची भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणे त्यांचे भाऊ आशिष फडणवीस सांभाळतात, अशी जोरदार टीका अमोल मिटकरी यांनी केली. ते कोणत्या हॉटेलमध्ये बसून कुणासोबत डील करतात, याचे सर्व रेकॉर्ड आहे. निवडणुकीवेळी ते बाहेर काढू, अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला. विटकरी यांनी अण्णा हजारे यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.