मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याच्या तयारीत असलेल्या तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 07:43 PM2019-09-14T19:43:14+5:302019-09-14T20:01:16+5:30
"दारूमुक्त महाराष्ट्र"च्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालून स्वागत करण्यापूर्वीच तृप्ती देसाई यांना सहकारनगर पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून शनिवारी दुपारी ताब्यात घेतले.
पुणे : "दारूमुक्त महाराष्ट्र"च्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालून स्वागत करण्यापूर्वीच तृप्ती देसाई यांना सहकारनगर पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून शनिवारी दुपारी ताब्यात घेतले.
महाराष्ट्रात दारूमुळे महिलांचे संसार उध्वस्त होत आहेत , तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. यामुळे सरकारने तत्काळ दारू बंदी करावी या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई या मुख्यमंत्र्यांना दारुच्या बाटल्या दाखवून निषेध व्यक्त करणार होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे पुणे शहरात आगमन होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरात मोठ्या उत्साहात या महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यात येत आहे. महाजनादेश यात्रा जाणाऱ्या मार्गावर ठिक ठिकाणी पोस्टर्स आणि कमानी उभारण्यात आल्या आहेत. संपूर्ण पुणे शहर स्वागतासाठी तयार असतानाच भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी मात्र "दारूमुक्त महाराष्ट्र "च्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालून स्वागत करण्याचे ठरविले होते.
भुमाता ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्या दाखवून दारूच्या बाटल्यांचा हार अर्पण करून निषेध करण्यात येणार आहे अशी माहिती सहकारनगर पोलिसांना मिळाली. तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सहकारनगर पोलिसांनी तृप्ती देसाई यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.
तृप्ती देसाई म्हणाल्या आम्ही सरकारच्या दडपशाहीचा जाहीर निषेध करीत असून आमचा विरोध सहन होत नाही तर मुख्यमंत्र्यांनी महिलांचे उध्वस्त होणारे संसार वाचविण्यासाठी तरी महाराष्ट्रात दारूबंदी तातडीने करावी. आज पोलीसांकडून आम्हाला तुम्ही ताब्यात घेतले पण लवकरच गनिमी काव्याने आम्ही दारूच्या बाटल्यांचा हार मुख्यमंत्र्यांना घालणारच असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.