तृप्ती देसाईंचा रास्ताराेकाे करण्याचा प्रयत्न ; पाेलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 05:31 PM2019-09-20T17:31:52+5:302019-09-20T17:34:56+5:30
भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी रास्ताराेकाे करण्याचा प्रयत्न केला.
पुणे : भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करावे या मागणीसाठी गंज पेठेतील महात्मा फुले वाड्यापासून बुधवार पेठेतील भिडे वाड्यापर्यंत मशाल माेर्चा काढण्यात आला हाेता. या माेर्चात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या देखील सहभागी झाल्या हाेत्या. माेर्चा दगडुशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ आल्यानंतर तृप्ती देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रास्ताराेकाे करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन समज देत साेडून दिले.
पुण्यातील भिडे वाड्यात महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरु केली. या वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करावे अशी मागणी करत आज सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती आणि युवा माळी संघाच्यावतीने माेर्चा काढण्यात आला. गंजपेठेतील फुले वाड्यापासून भिडेवाड्यापर्यंत महामशाल माेर्चा काढण्यात आला. फुले विचारांच्या हजारो समर्थकांनी या महामशाल मोर्चामध्ये सहभागी होऊन आपली मागणी मांडली. या माेर्चात तृप्ती देसाई देखील सहभागी झाल्या हाेत्या. मशाल माेर्चा दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ आल्यानंतर तृप्ती देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्ताराेकाे करण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच फरासखाना पाेलिसांनी तृप्ती देसाई यांना ताब्यात घेतले. त्यांना समज देऊन नंतर साेडण्यात आले.
दरम्यान या महामशाल मोर्चामध्ये महात्मा फुले वसतिगृह कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष दिपक जगताप, माजी आमदार कमलताई ढोले- पाटील, महामशाल मोर्चाचे मुख्य समन्वयक कल्याण जाधव, तसेच युवा माळी संघाच्या महिला अध्यक्षा आणि ओबीसी महासभेच्या महिला अध्यक्षा सुनीता भगत, युवा माळी संघाच्या चिटणीस वृषाली शिंदे, अमर हजारे, छाया भगत, सतीश गायकवाड, अरुण हरकळ, देवरा जाळे आदी मान्यवरांसह फुले विचारांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.