तृप्ती देसाईंचे वानवडी पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:13 AM2021-03-01T04:13:31+5:302021-03-01T04:13:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी चुलत आजी शांता राठोड यांची फिर्याद घेऊन वनमंत्री संजय राठोड यांच्यासह ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी चुलत आजी शांता राठोड यांची फिर्याद घेऊन वनमंत्री संजय राठोड यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी वानवडी पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्याप्रकरणात आज १८ दिवस झाले आहेत. तृप्ती देसाई या आज पूजा हिची चुलत आजी शांता राठोड यांना घेऊन वानवडी पोलीस ठाण्यात पोहोचल्या. तेथे पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यात त्यांनी वनमंत्री संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांनी पूजा चव्हाण हिला आत्महत्येस प्रवृत्त केले. तसेच जबरदस्तीने तिचा गर्भपात घडवून आणला. याप्रकरणी आयपीसी कलम ३०६, ३१३, ५०६ आणि ३४ याखाली गुन्हा दाखल करावा, असे जबाबात सांगितले. त्यावर पोलिसांनी आम्ही चौकशी करून गुन्हा दाखल करू, असे उत्तर दिले.
याबाबत तृप्ती देसाई यांनी सांगितले की, यापूर्वी पोलीस कोणी नातेवाईक फिर्याद देण्यास पुढे येत नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करता येत नाही, असे कारण सांगत होते. आता तिच्या नातेवाईकांनी फिर्याद दिली आहे. तेव्हा गुन्हा दाखल करून मग चौकशी करावी, अशी आम्ही मागणी केली आहे. त्यासाठी वानवडी पोलीस ठाण्याच्या बाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे.