भिस्त तीन पादचारी पुलांवर; प्रशासन पाहतेय दुर्घटनेची वाट, रोज २२० गाड्यांतून येतात अडीच लाख प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 06:45 AM2017-09-30T06:45:43+5:302017-09-30T06:45:49+5:30
शहरातील मुख्य रेल्वे स्थानकावरून दररोज २२० गाड्यांमधून अडीच लाख प्रवाशी ये-जा करीत असताना त्यांना केवळ तीन पादचारी पुलांवर अवलंबून राहावे लागत आहे.
पुणे : शहरातील मुख्य रेल्वे स्थानकावरून दररोज २२० गाड्यांमधून अडीच लाख प्रवाशी ये-जा करीत असताना त्यांना केवळ तीन पादचारी पुलांवर अवलंबून राहावे लागत आहे. सकाळी व संध्याकाळच्या वेळी या पुलांवर मोठी गर्दी होऊन प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून एखादी दुर्घटना घडण्याचीच वाट पाहिली जात आहे का, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे.
मुंबईतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संताप व्यक्त करत आहे. पुणे रेल्वे स्थानकावर केवळ तीनच पादचारी पुल असल्याने त्यांच्यावर मोठा ताण पडत आहे. या पुलांचे रूंदीकरण तसेच नवीन पादचारी पुलांची उभारणी रेल्वे प्रशासनाकडून केली जाणे आवश्यक असताना त्याबाबत काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.
पुणे रेल्वे स्थानक सुरू झाल्यानंतर ब्रिटिशांनी मुख्य पादचारी पुल बांधला. त्यानंतरच्या १०० वर्षांमध्ये केवळ दोनच पादचारी पादचारी पुल बांधण्यात आले. दरम्यानच्या काळात स्थानकातून ये-जा करणाºया रेल्वे व प्रवाशांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे.
मुख्य पूल हा द्वितीय वर्गाच्या प्रवेशद्वारापासून राजा बहादूर मोतीलाल मिल रस्त्यापर्यंत जातो. त्याचाच वापर प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात केला जातो. पार्सल आॅफिस शेजारील व सोलापूरच्या दिशेकडील पादचारी पुलाचा वापर त्या तुलनेत कमी होतो. त्यामुळे मुख्य पुलावर प्रचंड गर्दी होते. सकाळी ७ ते ९ व दुपारी ३ ते सायंकाळी ७ दरम्यान लांब पल्ल्यांच्या गाड्या स्थानकावर मोठ्या संख्येने येतात. एकाच वेळी हजारो प्रवाशी बाहेर पडण्यासाठी पादचारी पुलाचा वापर करतात. बॅगा घेऊन चालण्याची प्रचंड मोठी कसरत प्रवाशांना करावी लागते. ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले यांच्यासाठी कसरतच असते.
लोकसंख्या वाढूनही पुलांची संख्या कमीच
पिंपरी-चिंचवड शहर व परिसराची लोकसंख्या सुमारे तीन लाख असताना शहरातून जाणाºया पाच रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल उभारण्यात आले. मात्र, हीच लोकसंख्या वीस लाखांच्या वर गेलेली असतानाही पादचारी पुलांची संख्याही वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
रेल्वे स्थानकावरील अपुºया सोयी सुविधांमुळे मुंबईत प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. तिच परिस्थिती पुणे रेल्वे स्थानकावर आहे. इथे कधीही मोठी दुर्घटना घडू शकेल. अनेक दिवसांपासून पादचारी पुलांचे रूंदीकरण व नवीन पुलांची उभारणी करण्याची मागणी प्रवाशी संघाच्यावतीने करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रवाशांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेण्यासाठी रेल्वेच्या पादचारी पुलांवरून प्रवास करताना हेल्मेट घालणे तसेच वरून खाली उडी मारण्याची आवश्यकता भासल्यास जवळ पॅराशुट बाळगावा. - हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवाशी संघ
पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे प्रवाशांची संख्या, त्यासाठी उपलब्ध असणारे पादचारी पुल यांचा सर्व्हे करून त्यामध्ये काय सुधारणा करता येतील, याचा अहवाल तयार करण्याच्या सूचना रेल्वे अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. या सर्व्हेच्या अहवालानुसार बदल घडवून आणण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. त्याचबरोबर रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडेही त्याबाबतच्या मागण्या ठेवल्या जातील.
- अनिल शिरोळे, खासदार
पुणे रेल्वे स्थानकावर एकाचवेळी मुंबई, सोलापूरच्या दिशेने दोन गाड्या आल्या, त्याचवेळी लोकलही आली. त्यावेळी पादचारी पुलांवर प्रचंड गर्दी होऊन मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे नवीन पादचारी पुल उभारण्याची वेळोवेळी मागणी पुणे विभागीय सल्लागार समितीच्या बैठकांमध्ये करण्यात आली आहे. नवीन पुलाची उभारणी होईपर्यंत किमान रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांकडून गर्दीवर नियंत्रण ठेवले जावे.
- विकास देशपांडे,
अध्यक्ष, दौंड-पुणे प्रवासी संघ
रेल्वे स्थानकातून बाहेर पडण्यासाठी पादचाºयांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दारामध्ये मोठ्या प्रमाणात हॉकर्सकडून अतिक्रमण झाले आहे. याकडे पोलीस, रेल्वे प्रशासन यांचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
- माणिक बिर्ला,
अध्यक्ष, रेल्वे ट्रॅव्हल्स एजंट सर्व्हिस
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षितेला प्राधान्य द्यावे. मुंबईमध्ये झालेली चेंगराचेंगरीची घटना पुन्हा होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. पायाभूत व्यवस्था योग्य करण्यावर भर देण्यात यावा. - वंदना चव्हाण, खासदार
रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांचे दुर्लक्ष
पादचारी पुलांवर सायंकाळी व सकाळच्यावेळी मोठी
गर्दी होते. त्यावेळी तिथे रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी उपस्थित राहून अनुचित प्रकार घडणार नाही, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. प्रवाशांनीही गर्दीच्या वेळी रांगेने पुढे सरकणे, ढकला ढकली न करणे, उशीर होत असला तरी घाई न करणे आदींची काळजी घेतली पाहिजे.