विद्यार्थ्यांवर संघाचे विचार लादण्याचा प्रयत्न - राहुल गांधी
By admin | Published: July 31, 2015 01:11 PM2015-07-31T13:11:38+5:302015-07-31T13:35:05+5:30
शिक्षण संस्था तसेच अन्य संस्थांमध्ये भाजपा हस्तक्षेप करत असून विद्यार्थ्यांवर संघाचे विचार लादण्याचा प्रयत्न सुरू आहेत अशी टीका करत राहुल गांधींनी एफटीआयआयच्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला.
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ३१ - शिक्षण संस्था तसेच अन्य संस्थांमध्ये भाजपा हस्तक्षेप करत असून विद्यार्थ्यांवर संघाचे विचार लादण्याचा प्रयत्न सुरू आहेत अशी टीका करत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी एफटीआयआयच्या ( फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट) विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. एफटीआयआयच्या अध्यक्षपदी भाजपाचे समर्थक समजल्या जाणाऱ्या गजेंद्र चौहान यांची निवड झाल्याच्या विरोधात एफटीआयआयचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या ५०व्या दिवशी राहुल गांधींनी पुण्यात विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांचे गा-हाणे राहुल यांच्यासमोर मांडले. आपल्याला हिंदूविरोधी व नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे विद्यार्थ्यांनी राहुल यांना सांगितले. त्यावर ' केंद्र सरकार केवळ २५० विदयार्थ्यांच्या आंदोलनामुळे एवढं त्रस्त का आहे असा सवाल करत राहुल यांनी सरकारवर हल्लाबोल केला. केंद्राच्या मताशी सहमत नसाल तर आंदोलने चिरडली जातात. गेल्या महिन्याभरापासून शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे खेळखंडोब सुरू आहे. सर्व ठिकाणी, सर्व संस्थामध्ये भाजपा ढवळाढवळ करत असून संपूर्ण देशात अशीच परिस्थिती आहे असे सांगत विद्यार्थ्यांवर संघाेच विचार लादले जात आहेत, अशी टीका त्यांनी केली.
जरी त्यांच्याकडे ( चौहान) क्षमता असली तरी त्यांना विद्यार्थ्यांवर लादणं चुकीचे असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना ते पदावर नको असतील तर त्यांनी पदावर राहू नये. तसेच निर्णय प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा समावेश असला पाहिजे ' असे राहुल यांनी म्हटले. ' या आंदोलनात मी तुमच्या पाठीशी आहे, पण तुम्ही खंबीर असले पाहिजे, असे सांगत राहुल यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला.
गजेंद्र चौहान यांची निवड गुणवत्तेवर झाला नसल्याचा आरोप करत चौहान यांच्यासह नियामक मंडळाच्या सदस्यांची नियुक्ती रद्द करावी, या मागणीसाठी गेले ५० दिवस एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत गजेंद्र चौहान यांना पद सोडण्याचा सल्ला दिला. मात्र चौहान हे पायउतार होण्यास तयार नसून दुसरीकडे विद्यार्थीही त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. येत्या ३ ऑगस्ट रोजी विद्यार्थी दिल्लीत आंदोलन करणार आहेत.
दरम्यान राहुल गांधींच्या भेटीच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन करत राहुल यांच्या विरोधात घोषणा दिल्या.