‘नोर्इंग गांधीजम ग्लोबल फ्रेन्ड्स’मधून महात्मा गांधींंच्या विरोधकांच्या मतपरिवर्तनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 06:31 PM2017-11-04T18:31:55+5:302017-11-04T18:33:17+5:30
समाजात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जातोय. ही प्रतिमा सुधारण्यासाठी तीन वर्षांपूर्वी जनमानसामधून एक चळवळ उभी राहिली...
पुणे : देशाची फाळणी झाली ती गांधींमुळे. पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यायला लावले ते गांधींनीच. पटेल आणि नेहरू यांच्यापैकी महात्मागांधींनी नेहमीच पंडित नेहरूंना झुकत माप दिले, यांसारख्या अनेक अपप्रचारांमधून समाजात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जातोय. ही प्रतिमा सुधारण्यासाठी तीन वर्षांपूर्वी जनमानसामधून एक चळवळ उभी राहिली ती गांधी समजून सांगण्याची. ‘नोर्इंग गांधीजम ग्लोबल फ्रेन्ड्स’ या नावाने सोशल मीडियावर सुरू झालेल्या या चळवळीने अनेकांचे मतपरिवर्तन केले आहे. फेसबुकवर या चळवळीचे बारा हजार सदस्य तर व्हॉट्स अॅपवर जवळपास पंधरा ग्रुप सक्रिय आहेत. हे सत्यवचनावर मार्गक्रमण करणार्या गांधीजींच्या विचारांचेच एका अर्थाने फलित म्हणावे लागेल.
एकविसाव्या शतकात सोशल मीडिया हे जसे संवादाचे माध्यम म्हणून समोर आले तसेच ते अपप्रचार, गैरसमज परविण्याचेही आगार बनले. एखाद्या व्यक्तिबद्दल कुणीतरी काहीतरी सांगते आणि आपल्याला ते खर वाटते. मग त्यांच्याबद्दल बिनधास्तपणे खोटा प्रचार सुरू केला जातो. अगदी ज्यांनी देशासाठी सर्वस्व अर्पण केले, त्यांनाही एका क्षणात निकाली काढले जाते. काहीही माहिती नसताना, त्याची शहानिशा न करता मेसेज पुढे पाठविले जातात आणि मग अपुर्या माहितीअभावी अकलेचे तारे तोडत सुरू होते ट्रोलिंग. जनमानसात विशेषत: युवापिढीमध्ये गैरसमजाचे बळी ठरलेल्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे. महात्मा गांधी यांनी देशासाठी दिलेले योगदान, सत्य,अहिंसा या तत्त्वांवरची त्यांची वैचारिक मांडणी याकडे दुर्लक्ष करून गांधीजींबददल जाणीवपूर्वक गैरसमज पसरविले जात आहेत. चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून हे गैरसमजदूर व्हावेत, यासाठी ’नोईंग गांधीजम ग्लोबल फ्रेन्ड्स’ या नावाने तीन वर्षांपूर्वी फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर एक चळवळ सुरू करण्यात आली. युवकांच्या मनातील प्रश्न जाणून घेण्याबरोबरच गांधींजींबददल सुरू असलेल्या अपप्रचाराला मूठमाती देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, अशी माहिती ग्रुप अॅडमिन उमेश ठाकूर आणि गणेश चोंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. महात्मा गांधींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर अन्याय केला. त्यांना काँग्रेसचे अध्यक्षपद सोडायला लावले. सावरकरांना महात्मा गांधींनी जाणीवपूर्वक बाजूला ठेवले, महात्मा गांधी हुकूमशहा होते असा अपप्रचार गांधीजीबद्दल केला जात आहे, त्याचा बळी युवा पिढी ठरत आहे. सोशल मीडियावर गांधीजींबद्दल अर्वाच्य भाषेत बोलले जाते, ट्रोलिंग केले जाते. म्हणूनच लोकांच्या मनातील गांधीजींबद्दलचे प्रश्न जाणून घेण्याबरोबरच त्याचे निरसन करणे, चर्चा घडविणे, जे सांगत आहोत त्याचे संदर्भ देणे या गोष्टी आम्ही करीत आहोत. लोकांना समजावून सांगतानाही चिडचिड, विरोध किंवा अश्लील भाषेचा वापर न करता शांत आणि विवेकी मागार्ने आम्ही गांधीजींचे विचार पोहोचवित आहोत. जमेची बाजू म्हणजे या संवादातून आज अनेकांचे मतपरिवर्तन झाले आहे. या ग्रुपमध्ये अगदी हॉटेलमधील वेटरपासून ते माजी केंद्रीयमंत्री तसेच देशविदेशासह सर्व जातीधर्मांचे लोक आहेत. त्यांना खर्या अर्थाने आज गांधी उमगले असल्याचे त्यांनी सांगितले.
नारायण पेठेत राहात असताना संघ परिवाराच्या लोकांशी संपर्कात आल्याने गांधीजीबद्दल अनेकदा टीका करायचो, विनोद करायचो, त्यांच्यावर गाणी तयार केली होती. ती म्हणायचो. गांधीजींनी देशाचे नुकसान केले हे मनात पक्के रूजले होते. लोकांशी देखील गांधीजी किती वाईट होते हे सांगून हुज्जत घालायचो. कोथरूड मध्ये राहायला गेल्यानंतर सोसायटीच्या बाहेर एका स्टॉलवर ‘सत्याचे प्रयोग’ हे पुस्तक वाचनात आले. फेसबुकवरही काही लोकांना फॉलो करू लागलो, त्यातून व्हॉट्स अॅप आणि फेसबुकला जॉईन झालो आणि त्या ग्रुपचा आज अॅडमिनही झालो. आजही गांधी विचारांचे विरोधक आहेत मात्र आम्ही त्यांच्याशी हुज्जत घालत नाही किंवा त्यांच्या पोस्ट डिलिटही करत नाही. उलट वैचारिक चिंतनातून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो.
- गणेश चोंडे, इंटिरिअर डेकोरेटर