एकबोटे कुटुंबीयांच्या बदनामीचा प्रयत्न - डॉ. गजानन एकबोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 03:25 AM2018-04-07T03:25:05+5:302018-04-07T03:25:05+5:30
एकबोटे कुटुंबीयांचा स्वाती साठे यांच्याशी परिचय नसून त्यांना कधीही भेटलो नाही. साठे यांच्याशी असलेल्या वादातून हिरालाल जाधव यांनी जाणीवपूर्वक एकबोटे कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.
पुणे - एकबोटे कुटुंबीयांचा स्वाती साठे यांच्याशी परिचय नसून त्यांना कधीही भेटलो नाही. साठे यांच्याशी असलेल्या वादातून हिरालाल जाधव यांनी जाणीवपूर्वक एकबोटे कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जाधव यांनी याबद्दल माफी मागून दिलगिरी व्यक्त करावी. अन्यथा त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असे मिलिंद एकबोटे यांचे ज्येष्ठ बंधू व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी स्पष्ट केले.
कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी येरवडा कारागृहात कोरेगाव भीमाप्रकरणी अटकेत असलेले मिलिंद एकबोटे यांच्याशी एका व्यक्तीची गोपनीय भेट घडवून आणल्याचे वृत्त शुक्रवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले आहे. ठाणे मध्यवती कारागृहाचे अधिक्षक हिरालाल जाधव यांनी या संदर्भात राष्ट्रपतींसह पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र, एकबोटे कुटुंबीयांनी जाधव यांची तक्रार बदनामी करण्याच्या उद्देशाने केल्याचे म्हटले आहे. याविषयी बोलताना डॉ. गजानन एकबोटे म्हणाले, कोरेगाव भीमा प्रकरणात मिलिंद एकबोटे यांचा प्रथमदर्शनी सहभाग असल्याचा पुरावा आढळत नाही. त्यामुळे सत्र न्यायालयाने त्यांना एका प्रकरणात दोन दिवसापूर्वीच जामीन मंजूर केला आहे. तसेच हा जामीन रद्द करण्याची मागणी करणारा अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. आमचा भाऊ सरळमार्गी आहे. मीही त्यांना कारागृहात भेटण्यासाठी रांगेत उभे राहून पास काढला. जाळीतून आमची भेट झाली.
स्वाती साठे यांना आम्ही ओळखत नाही. त्यामुळे मिलिंद एकबोटे यांची ओळख असण्याचा प्रश्नच नाही. जाधव हे सेवेतून बडतर्फ असून एका प्रकरणात त्यांनी साठे यांना अडकविण्याचा प्रयत्न केला होता. या दोघांच्या भांडणात आम्हाला अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जाधव यांनी जाणीवपूर्वक एकबोटे कुटुंबीयांची बदनामी करण्यासाठी ही तक्रार केली आहे. जे बडतर्फ झाले आहेत, त्यांची विश्वासार्हता काय आहे? त्यामुळे त्यांच्या तक्रारीत काहीही तथ्य नाही. विनाकारण मिलिंद एकबोटे यांना अडकविले जात आहे. त्यामुळे जाधव यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा त्यांच्याविरोधात अबु्रनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असे डॉ. एकबोटे यांनी सांगितले.
मिलिंद एकबोटे हे १५ वर्षे नगरसेवक होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी वाहून घेतले आहे. आतापर्यंत त्यांनी २५ हजार गायींचे रक्षण केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे दैवत आहे. त्यांच्यावर त्यांनी खूप लेखही लिहिले आहेत. क्रांतिवीर लहुजी प्रतिष्ठानमार्फत आतापर्यंत त्यांनी ५० हजार दलित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. त्यांचे ८० टक्के कार्यकर्ते दलित आहेत. सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यामुळे त्यांना विनाकारण या प्रकरणात गोवण्यात आले आहे. - डॉ. गजानन एकबोटे